Monday, November 25, 2024
Homeअग्रलेखअथक प्रयत्न हाच उपाय

अथक प्रयत्न हाच उपाय

पुरोगामी राज्य अशी महाराष्ट्राची देशात ओळख आहे. तथापि राज्यात जातीपातींची मुळे समाजात खोलवर रुजल्याचे आढळते. सरकारी दाखले, प्रमाणपत्रे, प्रवेशाचे दाखले अशा विविध कागदपत्रांवर जात लिहावी लागते. अंतरजातीय विवाह अजूनही समाजमान्य नाहीत. जातीबाह्य लग्न केले म्हणून पोटच्या गोळ्याचा जीव घ्यायलाही माणसे तयार होतात. कायद्याने मनाई असली तरी जातपंचायतींची दहशत लोक अनुभवतात. नाशिक जिल्ह्यात मनमाड रुग्णालयात रुग्णांना त्यांची जात विचारली जात असल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले. त्यावरून वादंग झाले.अशी कोणत्याही प्रकारची घटना उघडकीस आली की  त्यानंतर समाजात खळबळ उडणे स्वाभाविकच. माणसामाणसात भेद निर्माण करणारी जात समाजातून हद्दपार करण्यासाठी संत, समाजसुधारक आणि समाजधुरीणांनी आयुष्य वेचले. त्यांच्या साहित्यातून कठोर प्रहार केले. माणसे शिकली तर विचार करतील. अनिष्ट रूढी-परंपरांचा त्याग करतील. जातीपाती संपुष्टात येतील असे मानले जात होते. किंबहुना त्या उद्देशानेच शिक्षण प्रसारासाठी समाजसुधारकांनी कष्ट उपसले. ‘विद्येविना गती गेली, गतिविना मती गेली, मतीविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले’ असे महात्मा फुले म्हणतात. साक्षरतेत महाराष्ट्र देशात सहाव्या स्थानी आहे. तथापि जातपात पाळण्याचा अनर्थ तर सुरूच असल्याचा लोकांचा अनुभव आहे. जातपात हा राजकीय मुद्दा आहेच. कोणत्याही मुद्द्यावरून राजकारण करत एकमेकांवर दुगाण्या झाडणे हे राजकीय पक्षांचे कामच नव्हे का? विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरणे आणि सत्ताधारी पक्षाने आरोप नाकारणे याही बाबतीत घडले तर नवल ते काय? जातीपाती हद्दपार होण्याऐवजी त्या मनामनात खोलवर रुजण्यात राजकीय पक्ष मोलाची भूमिका बजावतात यावर कोणाचेही दुमत नसावे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी जातीपातीचे राजकारण करण्यात सगळेच राजकीय पक्ष आघाडीवर असतात. जातींच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या सामाजिक संस्था आणि मंडळांना कोणाचे पाठबळ मिळते हे वेगळे सांगण्याची गरज आहे का? दुर्दैवाने याबाबत ‘उडदामाजी काळे गोरे..’ अशी परिस्थिती आहे. व्यासपीठावरून जातीपातींच्या विरोधात भाषणे करायची आणि मतांचे गणित जुळवण्यासाठी जातींचा विचार केला जातो ही वस्तुस्थिती आहे. किती राजकीय पक्षांना जातीपाती हटवण्यात रस असेल? हे आव्हान सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसुधारकांना पेलावे लागणार आहे. ही लढाई किती अवघड आहे हे वेगळे का सांगायला हवे? तथापि या क्षेत्रात अनेक कार्यकर्ते तनमनधन अर्पून स्वयंस्फूर्तीने  काम करत आहेत. अनेक समाजानी त्यांच्या उपजातींमध्ये रोटीबेटी व्यवहार मान्य केल्याचे वृत्त अधूनमधून माध्यमात झळकते. आंतरजातीय विवाह समाजमान्य होत आहेत. परजातीची वधू किंवा वर अनेक घरांमध्ये सहज स्वीकारले जात आहेत. मुलांनी त्यांचे विवाह परस्पर जुळवण्याला पालक आक्षेप घेत नाहीत. अशा घटना अपवादानेच आढळतात. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या असतात हे खरे. तथापि तळे थेंबे थेंबच साचते. मिट्ट काळोखात वाट दाखवायला मिणमिणती पणती देखील पुरेशी ठरते. अनिष्ट रूढी-परंपरा आणि जातीपाती हद्दपार करण्याचे प्रयत्न अथक सुरूच ठेवावे लागतील. समाजसुधारकांचा वारसा प्रयत्नपूर्वकच जपावा लागणार आहे. त्याचे राजकारण होणार नाही याची दक्षता कार्यकर्त्यांना घ्यावी लागेल. जातीपातीवरून समाजभेदाची किंमत प्रसंगी माणसांनाच मोजावी लागते याचे भान समाजाला येण्यातच सर्वांचे भले दडलेले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या