नाशिक | प्रतिनिधी
सातपूर पोलिसांत दाखल गंभीर गुन्ह्यातील संशयित प्रकाश मोगल लोंढे उर्फ बॉस याला मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर गुरुवारी (दि. १५) दुपारी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून त्याची सुटका झाली. मात्र, कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो सातपूर येथील आपल्या निवासस्थानी न परताच अज्ञातस्थळी रवाना झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम १०९, ३०८, ३२४ सह मकोका, आर्म्सअॅक्ट आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात प्रकाश मोगल लोंढे याला २५ ऑक्टोबर २०२५ रोजी अटक करण्यात आली होती. जवळजवळ वर्षभरानंतर त्याला जामीन मिळाला आहे. न्या. मिलिंद जाधव यांच्या आदेशानुसार, लोंढे याला प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत सातपूर पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. एका बाजूला मकोकासारख्या गंभीर गुन्ह्यातील संशयित सुटल्याने आणि दुसरीकडे तो सातपूरमध्ये न थांबता अज्ञातस्थळी निघून गेल्याने पोलीस प्रशासनासह गुन्हेगारी वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.




