Tuesday, April 28, 2026
Homeक्राईमAhilyanagar : धार्मिक स्थळाची तोडफोड; नगरमध्ये तणाव

Ahilyanagar : धार्मिक स्थळाची तोडफोड; नगरमध्ये तणाव

पहाटेच्यावेळी कृत्य, समाजकंटकांची धरपकड, मुस्लिम समाजाचा मोर्चा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहराच्या मध्यवर्ती भागातील पटवर्धन चौकाजवळील धार्मिकस्थळी काही समाजकंटकांनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 24) पहाटे सुमारास घडली. जेसीबीच्या सहाय्याने नुकसान करून जाणीवपूर्वक धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न केला. या घटनेने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, यासंदर्भात अ‍ॅड. वसीम रऊफ खान (वय 35, रा. आनंदीबाजार, अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

काही समाजकंटक रविवारी पहाटे 2.45 ते 3.00 वाजताच्या सुमारास घटनास्थळी जेसीबी व दुचाकीवरून आले. त्यांनी धार्मिक स्थळाची तोडफोड करून जाणीवपुर्वक धार्मिक भावना दुखवून दंगल घडवून आणण्याचा व सामुदायिक सौहार्द बिघडवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न केला. हा प्रकार पहाटेच काही स्थानिकांच्या लक्षात आला. याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळताच त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती दिली. घटना उजेडात आल्यानंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला. पोलीस अधीक्षक सोमनाथघार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.

महापालिकेच्या पथकाला पाचारण करण्यात आले. तोडफोड झालेल्या ठिकाणी दुरूस्तीचे काम तात्काळ हाती घेतले. घटनेची माहिती सकाळी शहरात वार्‍यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात असून कोणताही अप्रिय प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

समाजकंटकांची धरपकड
पोलिसांनी घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर तोडफोड करणार्‍या समाजकंटकांची धरपकड सुरू केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी योगेश सखाराम झोंड (रा. धोंडेवाडी रस्ता, वाळकी, ता. अहिल्यानगर) व जेसीबी चालक बबलु रामभाऊ पाल (रा. बोरूडे मळा, अहिल्यानगर, मुळ रा. बनारास, उत्तरप्रदेश) यांना ताब्यात घेतले. योगेश झोंड याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने हा प्रकार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान, कोतवाली पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे. इतर संशयितांची धरपकड पोलिसांकडून सुरू आहे.

मुस्लिम बांधवांचा मोर्चा
घटनेची माहिती समजल्यानंतर मुस्लिम समाज आक्रमक झालेला पाहिला मिळाला. दुपारनंतर त्यांनी मोर्चाचे नियोजन केले. कोठला येथे एकत्र येत कोठला ते पोलीस अधीक्षक कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. हातात विविध घोषवाक्य असलेले फलक घेऊन मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवदेन देण्यात आले असून संशयित आरोपींना अटक करावी, मुख्य सूत्रधार शोधावा आदी मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तत्काळ गुन्हा दाखल करून संशयितांना ताब्यात घेतले आहे. संबंधीत जेसीबी ताब्यात घेण्यात आला असून पसार इतर संशयितांचा तात्काळ शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे.
– सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक.

ताज्या बातम्या

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर

0
मुंबई | वृत्तसंस्था Mumbai गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच...