प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी अकाली ओढवून घेतलेला मृत्त्यू सर्वानाच चटका लावणारा ठरला. त्यांच्याविषयी माध्यमांशी बोलताना अनेकांना भावनावेग आवरला नाही. सगळेच भरभरून बोलले. नितीन देसाई माणूस म्हणूनही किती मोठे होते हेही अनेकांनी आवर्जून सांगितले. ते कलासक्त, सर्जनशील आणि प्रसिद्ध होते. तरीही त्यांनी आत्महत्या का केली या प्रश्नाने सर्वांनाच सतावले आहे.
आधीही सुशांतसिंग राजपूत, भय्यू महाराज या व अशाच आत्महत्यांच्या वेळी तसेच घडले होते. सामान्य माणसांना आयुष्यात काय हवे असते? थोडेसे आर्थिक स्थैर्य आणि भौतिक सुखे. वर उल्लेखलेल्या व्यक्तींनी त्याच्याही पलीकडे जाऊन गळे काही प्राप्त केले होते. सामान्यांच्या दृष्टीने ते परिकथेतील आयुष्य जगत होते. आव्हानांचा सामना करणे किंवा प्रयत्नांचे महत्व त्यांना कोणी वेगळे सांगण्याची आवश्यकता नव्हती. त्यांचे रोजचे जगणे म्हणजे तोच अनुभव होता.
तरीही आत्महत्या करावी असे त्यांना का वाटले असावे? माणूस जसजसा मोठा होत जातो तसतसा तो एकटा होत जात असावा का? तो आणि त्याचे आप्तेष्ट यांच्यामध्ये संवादाची दरी निर्माण होत असावी का? समाजात निर्माण झालेली त्यांची स्वप्रतिमा जपण्याचा ताण काळाबरोबर अधिकाधिक गडद होत असावा का? त्यांच्या आयुष्याची दुसरी बाजू समाजासमोर क्वचितच येते. कदाचित त्यामुळेच अवचित संकट उभे राहू शकते, कोलमडून पडण्यासारख्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो हेच त्यांच्या पचनी पडत नसावे का? तथापि परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्यावर मात करता येते याचे अमिताभ बच्चन हे चपखल उदाहरण. त्यांच्याही आयुष्यात एकवेळ अशी आली होती की सगळे काही संपले हीच भावना कोणाच्याही मनात बळकट झाली असती. तथापि बच्चन यांच्या बाबतीत तसे घडले नाही. ते पुन्हा एकदा नव्या दमाने आणि उत्साहाने उभे राहिले. परिस्थिती एखाद्या व्यक्तीकडून सगळे काही हिरावून घेऊ शकते पण त्याच्यामधील कौशल्ये मात्र नाही हे बच्चन यांनी कृतीतून सिद्ध केले. त्यांचे आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या शेकडो लोकांचे आयुष्य त्यांनी सावरले. कठीण परिस्थितीत त्यांना त्यांच्या आयुष्याचे ध्येय सापडले होते. आयुष्य जगण्याचे ध्येय समोर असले की मनुष्य त्याच्या पूर्तीसाठी स्वतःला समर्पित करतो. त्याचाच ध्यास त्याला लागतो. वेड लागते म्हणू यात हवे तर. त्यापुढे मग त्या ध्येयापुढे सगळी आव्हाने किस झाड की पत्ती वाटू शकतात. अत्यंत कठीण परिस्थितीही माणसाला त्याच्या जीवनाचा अर्थ आणि उद्देश सापडला तर परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य त्याच्यात निर्माण होते. त्या उद्देशाचा शोध ज्याच्या त्याने घ्यायला हवा असा सल्ला अनेक मानसतज्ञ देतात. त्यातील मर्म लोकांनी लक्षात घ्यायला हवे. आत्महत्येने कोणतेही प्रश्न सुटत नाहीत याची खूणगाठ मनाशी बांधायला हवी. प्रसिद्ध व्यक्तींच्या आत्महत्यांमुळे आत्महत्येसारख्या भयानक उपायाला उजळ करण्याचा आणि अस्वस्थ लोकांनाही प्रसंगी तोच मार्ग खुणावू शकण्याचा धोका निर्माण होतो. हा गंभीर परिणाम त्यांनी समजून घ्यायला हवा. अशा आत्महत्या परस्पर संवादाचे, जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे आयुष्यातील महत्व अधिक ठळक करतात. माणूस कितीही मोठा झाला तरी ही मूल्ये हरवू देऊ नयेत हाच धडा त्यातून शिकायला हवा. आप्तेष्ठांकडे मनमोकळे करण्यात कसला आला कमीपणा हेही खरे. तेव्हा जीवापेक्षा अन्य कशाचे मोल मोठे असू शकेल?