Thursday, November 21, 2024
Homeब्रेकिंग न्यूजSharada Sinha: सुप्रसिध्द गायिका शारदा सिन्हा यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला...

Sharada Sinha: सुप्रसिध्द गायिका शारदा सिन्हा यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
बिहारच्या लोकगायिका पद्मभूषण शारदा सिन्हा यांचे कॅन्सरमुळे निधन झाले आहे. दिल्ली एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शारदा सिन्हा यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. शारदा सिन्हा यांनी त्यांच्या आवाजाने अनेकांचं मनोरंजन केले. वयाच्या ७२ व्या वर्षी बिहारच्या गायिकेने शेवटचा श्वास घेतला.

गायिका शारदा सिन्हा यांचे निधन झाल्यामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. शारदा सिन्हा यांना सोमवारी सायंकाळी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गायिका मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे या अवस्थेत होत्या. छठपूजेच्या पहिल्याच दिवशी शारदा सिन्हा यांनी जगाचा निरोप घेतला. गायिका शारदा सिन्हा यांचा मुलगा अंशुमन सिन्हा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही दुःखद बातमी शेअर केली आहे.

- Advertisement -

अंशुमन सिन्हा आईचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, ‘तुमच्या प्रार्थना आणि प्रेम सदैव आईसोबत असेल. छठी मैयाने आईला स्वतःकडे बोलावले आहे. आई आता शारीरिकदृष्ट्या आपल्यात नाही.’ सध्या अंशुमन याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बुधवारी सकाळी शारदा सिन्हा यांचे पार्थिव दिल्लीहून पाटणा येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांचे अंत्यसंस्कार पाटणा येथे होणार आहे. जवळचे मित्र आणि कुटुंबिय शारदा सिन्हा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचतील.

शारदा सिन्हा यांनी भोजपुरी आणि मैथिली भाषेत अनेक लोकगीते गायली. बॉलीवूडमध्ये त्यांनी सलमान खानच्या ‘मैने प्यार किया’ चित्रपटातील एका गाण्यालाही आपला आवाज दिला आहे. त्यांना १९९१ मध्ये ‘पद्मश्री’ आणि २०१८ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शारदा सिन्हा यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. तसेच शारदा सिन्हा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. शोक व्यक्त करत ते म्हणाले की,” प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांच्या निधनाने खूप दुःख झाले. त्यांनी गायलेली मैथिली आणि भोजपुरी लोकगीते गेल्या अनेक दशकांपासून खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या निधनाने संगीत जगताची कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझे विचार त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि चाहत्यांसोबत आहेत.”

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या