Tuesday, March 25, 2025
HomeनगरRepublic Day 2025: प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

अहिल्यानगर । Ahilyanagar

भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजवंदन केले.

- Advertisement -

कार्यक्रमास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल आदी उपस्थित होते. यावेळी शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

संचलनात पोलीस दलाचे पुरुष आणि महिला पोलीस, गृहरक्षक दल, वाहतूक पोलीस, बँड पथक, श्वान पथक, वज्रवाहन, सायबर सेल जनजागृती वाहन, क्षयरोग दुरीकरण वाहन, बालविवाहास प्रतिबंध जनजागृती वाहन तसेच न्यू आर्टस अँड कॉमर्स, सायन्य महाविद्यालय, त्रिमुर्ती पब्लीक स्कूल, नेवासा, आठरे पब्लिक स्कूल, वर्का हायस्कुल, कारमेल कॉन्व्हेंट स्कूल, दिवटेपाटील पब्लिक स्कूल, स्नेहालय स्कूल, मेहेर इंग्लिश स्कूल या शाळांच्या मुले व मुलींच्या पथकांनी सहभाग घेतला.

यावेळी शहीद नाय‍क एकनाथ कर्डिले यांना पंतप्रधान श्रीमती शेख हसिना गण प्रजातंत्रात्मक बांग्लादेश सरकारद्वारे मिळालेले सन्मानपत्र वीरपत्नी कौशल्याबाई कर्डिले यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र देवमन वाघ यांचा तसेच पोलीस दलामध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, सहायक फौजदार रवींद्र पांडे, पोलीस हवालदार सुरेश माळी, विश्वास बेरड, पोलीस कॉन्स्टेबल फुरकान अब्दुल मुजीब शेख, प्रशांत राठोड यांचाही पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमानंतर पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

सर्वांगीण विकासातून राज्यातील अग्रगण्य जिल्हा म्हणून अहिल्यानगरची ओळख निर्माण करु- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेल्या भाषणात जिल्ह्यातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासातून राज्यातील अग्रगण्य जिल्हा म्हणून अहिल्यानगरची ओळख निर्माण करु, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पालकमंत्री म्हणाले, भारतीय राज्यघटनेचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणे ही सर्वांच्यादृष्टीने अत्यंत अभिमानाची व प्रेरणादायी बाब आहे. ‘लोकांनी, लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य’ हा लोकशाहीचा आत्मा जपतांना, आपल्या देशाची ७५ वर्षांची यशस्वी वाटचाल ही जगासमोर आदर्श लोकशाही व्यवस्थेचे उदाहरण ठरले आहे.

स्वातंत्र्यानंतर देशाने शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, तंत्रज्ञान आणि सामाजिक सुधारणांमध्ये केलेली प्रगती सर्वांना अभिमान वाटावा अशीच आहे. राज्य घटनेतील समानता, आणि बंधूत्वाचे तत्व स्विकारतांना राज्याच्या विकासात समाजातील सर्व घटकांना सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न राज्य शासनामार्फत करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

‘समृद्ध शेती आणि संपन्न शेतकरी’ हे उद्दिष्ट समोर ठेऊन शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांमधून शेतकऱ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने स्मारक, नेवासा येथे संत ज्ञानेश्वर महाराज सृष्टी प्रकल्प, पर्यटन विकास, शैक्षणिक संस्थांना एकत्रित करत रोजगार निर्मिती यासह विकास आराखड्याच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाचे प्रयत्न करण्यात येत आहेत. या विकासकामामध्ये सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी केले.

पालकमंत्री विखे पाटील यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठामार्फत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी देऊन सन्मानित केले. त्याबद्दल जिल्ह्यातील नागरिकांच्यावतीने जिल्हाधिकारी श्री.सालीमठ यांनी त्यांचा सन्मान केला. विक्रमी ध्वजदिन निधीचे संकलन करुन जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला. तसेच मतदार जागृती उपक्रमात जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केल्याने अमेरिकन मेरीट कौन्सिलने जिल्ह्याचा गौरव केल्याबद्दल जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘घर घर संविधान’ कार्यक्रमाअंतर्गत शासकीय विभाग प्रमुखांना भारतीय संविधान उद्देशिकेची प्रतही देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची सांगता झाली .

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...