नाशिक | प्रतिनिधी Nashik
अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध दर्शवत रिपब्लिकन सेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (दि.१९ ) नाशिक दौऱ्यावर येत असताना त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार असल्याची घोषणा रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अविनाश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.
आरक्षण उपवर्गीकरणाला अनुसूचित जातीतील मोठ्या घटकांचा विरोध असतानाही सरकारकडून प्रक्रिया पुढे रेटली जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. केवळ एका घटकाच्या मागणीचा आधार घेऊन उर्वरित ५९ उपजातींच्या भावना, भूमिका आणि आक्षेपांकडे दुर्लक्ष करणे हा सामाजिक न्यायाच्या मूलभूत भूमिकेलाच छेद देणारा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित समाजघटकांशी संवाद साधणे ही सरकारची जबाबदारी आहे.पक्षप्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर मोर्चे निघत असताना चर्चा न करता निर्णय लादण्याचा प्रयत्न केल्यास तो रिपब्लिकन सेना कदापि स्वीकारणार नाही, असा इशारा शिंदे यांनी दिला.
उपवर्गीकरणाचा विषय सामाजिक न्यायाशी निगडित असल्याने आंबेडकरी समाजातील विविध नेते, संघटना आणि संबंधित घटकांशी मुख्यमंत्र्यांनी खुली चर्चा करावी. मात्र, या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आंबेडकरी नेत्यांना भेटण्याचे मुख्यमंत्री टाळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारने भूमिका बदलली नाही तर आंदोलन महाराष्ट्रभर तीव्र करण्यात येईल. नाशिकपासून आंदोलनाची ठिणगी पेटणार’, असा इशारा देत महाराष्ट्र दौऱ्यावर येणाऱ्या मंत्र्यांना या प्रश्नावर जाब विचारण्याची भूमिका रिपब्लिकन सेनेने घेतल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
यावेळी महाराष्ट्र नेते विनय कटारे, जिल्हा महासचिव जिथेश शार्दुल, युवा सेना अध्यक्ष सुनील साळवे , कार्याध्यक्ष मारुती घोडेराव उपस्थित होते. सरकारने संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारावा, अन्यथा नाशिकपासून सुरू होणारे आंदोलन महाराष्ट्रव्यापी जनआंदोलनात रूपांतरित करू, असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.




