सुरगाणा | प्रतिनिधी
सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणारा प्रमुख जलस्रोत असलेल्या बनपाडा पाझर तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाणी साठवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
सुरगाणा तालुका हा अदिवासी बहुल तालुका असून तालुक्यातील मुख्य बाजरपेठ सुरगाणा शहर असून तालुक्यातील १० ते १२ हजार नागरिक रोज शहरामध्ये शासकीय निमशासकीय कामासाठी येत असते. सुरगाणा शहरात पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या असल्याने बनपाडा पाझर तलावातील गाळ काढण्यासाठी सुरगाणा नगरपंचायतचे नगराध्यक्ष भारत वाघमारे यांच्या नेतृत्वात नगरसेवक व नागरिक यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन देण्यात आले आहे.
नगरपंचायत मार्फत पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे सर्व सामन्य माणसाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. सदर सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणारे बनपाडा पाझर तलाव हे सन १९७८ साली बांधण्यात आले असून त्यावेळी पाझर तलावाची क्षमता हि ५ टीएमसी होती. तलावाचे बांधकाम झाल्या नंतर आजपर्यंत त्यातला गाळ काढण्यात न आल्यामुळे सद्या पाझर तलावाची पाण्याची क्षमता हि १.५ टीएमसी एवढी राहीली आहे. बनपाडा पाझर तलावच्या पाण्यावर सुरगाणा शहर, बुबळी, श्रीभुवन, हट्टी, मालगव्हाण, भदर या ग्रामपंचायतींच्या गावातील नागरिक पाण्यासाठी अवलंबून असून त्यामुळे दर वर्षी पाणी टंचाई भासते. पाझर तलावातील गाळ गेली ४५ वर्षा पासून काढलेला नाही. तलावातील गाळ काढल्यास पाण्याची साठवण क्षमता वाढून पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल. असे निवेदन मंत्री दादा भुसे यांना दिले आहे. निवेदनावर नगराध्यक्ष भरत वाघमारे, सचिन आहेर, भगवान आहेर, पुष्पा वाघमारे, प्रमिला भोये राधा वाघमारे अरुणा वाघमारे ,गणेश चापळकर मयुर हिरे, दिनेश वाघ सनी समवंशी आदींच्या सह्या आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा