नाशिक । प्रतिनिधी Nashik
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतून सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील नागरिकांच्या समस्यांचे निरसन करण्यासाठी चौक सभा घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने परिमंडळ 1 व 2 च्या हद्दीतील म्हसरूळ, आडगाव, भद्रकाली, सातपूर, उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चौक सभा घेण्यात आल्या.
यावेळी अधिकार्यांनी उपस्थित नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्यांनी सुचवलेल्या सूचना, तक्रारी हया समजून घेत त्यांच्या समस्याचे निरसन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना अल्पवयीन व तरुण मुलांचा गुन्ह्यात वाढता सहभाग लक्षात घेता पालकांनी मुलांकडे बारकाईने लक्ष देणे तसेच मुलांकडून गुन्हा घडल्यास होणारे दुष्परिणामाविषयी माहिती देण्यात आली.
तसेच तरुण मुला, मुलींनी फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटस्अॅप व सोशल मीडिया हाताळतांना घ्यावयाची दक्षता, अंमली पदार्थाचे दुष्परिणाम, महिलांनी चेनस्नॅचिंगच्या अनुषंगाने घ्यावयाची दक्षता, ऑनलाईन फ्रॉड, बतावणी याबाबत माहिती देण्यात आली. तसेच परिसरात विनाकारण फिरणारे टवाळखोर, संशयित व्यक्ती निदर्शनास आल्यास तसेच काही परिसरात अनुचित प्रकार घडत असल्यास तत्काळ 112 या हेल्पलाईनवर संपर्क करण्याबाबत आवाहन करण्यात आले.