Monday, September 16, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीवर तातडीने मार्ग काढा

नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीवर तातडीने मार्ग काढा

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

नाशिक-मुंबई रस्ता वाहतूक कोंडीचा सापळा झाला आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठी काही तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. यावर ऑगस्ट २०२४ पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, हे मंत्र्यांचे उत्तर अत्यंत असंवेदनशील आणि चुकीचे असल्याचे सांगत काँग्रेसचे जेष्ठ्य आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी विधानसभेत नाशिक-मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर तातडीने मार्ग काढण्याची मागणी केली.

समाजवादी पक्षाचे आमदार आमदार रईस शेख यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी, वडपे ते ठाणे आठ पदरी रस्त्याचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मंजूर केल्याची माहिती दिली. या रस्त्याचे आठ पदरी रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने येथे वाहतूक कोंडी होत असून यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे भुसे यांनी सांगितले. या उत्तरावर विरोधी पक्षाचे समाधान झाले नाही.

भिवंडी बायपास ते ठाणे या प्रवासामध्ये प्रवाशांना दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगांचा सामना करावा लागतो. मी देखील या रस्त्यावरून प्रवास करतो. जळगाव, धुळे, अहमदनगर आणि विदर्भ तसेच मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यातील प्रवाशी याच मार्गावरून मुंबईमध्ये येतात. या रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. छगनराव भुजबळ, दादा भुसे, अनिल पाटील हे मंत्री सुद्धा याच मार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे आज तुम्ही तिकडे जाऊन बसलात नाहीतर तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर या विषयात आरडाओरडा केला असता, असा टोला थोरात यांनी लगावला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दरम्यान, यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना भुसे म्हणाले, मी स्वतः मागील आठवड्यात या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा आढावा घेतला. तिथे ज्या ज्या उपायोजना कराव्या लागतील त्या उपाययोजना करून आठवडाभरात तुम्हाला तिथे किमान ५० टक्के बदल झालेला दिसेल. या रस्त्याचे काम जवळपास ३० टक्के पूर्ण होत आले आहे. उर्वरित काम ऑगस्ट २०२४ पर्यंत पूर्ण होईल. पावसाळ्याच्या काळात या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, वाहतूक सुरळीत राहील यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, पोलीस, परिवहन, महामार्ग, सर्व संबंधित यंत्रणांना या महामार्गावर नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने उपयोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे अशा ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डने तातडीने वाहतूक कोंडी सोडवण्यात यावी आणि रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत, अशा सूचनाही देण्यात येतील, असे भुसे यांनी यावेळी सांगितले.

यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यात अनेक ठिकाणी पायाभूत प्रकल्पांचे काम सुरू आहेत, याकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. भविष्यात असे पायाभूत प्रकल्प करत असताना आपण पर्यायी व्यवस्था देखील उपलब्ध करून दिली पाहिजे आणि त्या संदर्भात भविष्यात आपण काळजी घ्यावी, अशी सूचनाही नार्वेकर यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या