Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात कडकडीत बंद, 'यांचा' सहभाग

पुण्यात कडकडीत बंद, ‘यांचा’ सहभाग

पुणे | प्रतिनिधी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आणि कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवावे या मागणीसाठी  विविध संघटनांनी आणि पक्षांनी मिळून आज पुणे बंदची हाक दिली आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कडकडीत बंद पाळण्यात आला. 

- Advertisement -

विविध शिवप्रेमी संघटना, राजकीय पक्ष,  व्यापारी त्याचप्रमाणे रिक्षा चालक, हमालपंचायत, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना आदींनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळ पासून पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट होता. पुण्यातील सर्वात गजबजलेला परिसर असलेल्या मार्केटयार्ड परिसरात देखील शुकशुकाट पाहायला मिळाला. सकाळी ९ वाजता डेक्कन येथील संभाजी महाराज पुतळ्यापासून सर्वपक्षीय मुक मोर्च्याला सुरुवात झाली. यात अनेक नेते, आमदार खासदार सहभागी झाले होते.

पुण्यातील डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास खासदार छत्रपती उदयनराजे यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर मुक मोर्चाला  सुरुवात झाली. यामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे नेते माजी आमदार मोहन दादा जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, रूपाली ठोंबरे , प्रदीप देशमुख, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, विकास पासलकर, मुस्लिम मूलनिवासी मंचाचे अंजुम इनामदार सहभागी झाले.

मोर्चामध्ये महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात आहे.  राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी काळीपट्टी दंडाला बांधत निषेध व्यक्त केला. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा चित्र असलेला झेंडा आणि भगवे झेंडे घेऊन कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाल्याने भगवामय वातावरण पाहवयास मिळाले. सदर मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी निषेध मोर्चा सुरू झालेल्या डेक्कन परिसर ते लाल महाल या दरम्यान चोख बंदोबस्त तैनात केला आहे. दुपारी ३ पर्यन्त हा बंद पाळण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या