Thursday, June 13, 2024
Homeनगरपाठ्यपुस्तके शाळेत पोहचविण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकार्‍यांची!

पाठ्यपुस्तके शाळेत पोहचविण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकार्‍यांची!

तालुका पातळीवरून टेंडर काढून वाहतूक करण्याचे आदेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हा पातळीवरून काढण्यात आले आहेत. यासाठी तालुका पातळीपर्यंत पाठ्यपुस्तके आल्यानंतर ते शाळा पातळीवर पोहचवण्याची कामगिरी प्रत्येक तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. याबाबतचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी जिल्हा पातळीवरून काढले आहेत.

दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतात. यासाठी पूर्वी पुण्यातील बालभारतीकडून जिल्हा पातळीवर, त्यानंतर तालुका आणि तालुका पातळीवरून केंद्र शाळा पातळीवर पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतात. केंद्र पातळीवरून संबंधित शाळेच्या शिक्षकांना स्वत:च्या गाडीत अथवा स्वखर्चाने पाठ्यपुस्तके शाळा पातळीवर न्यावी लागत होती.

यंदा मात्र या प्रक्रियेत बदल करण्यात आला असून आता तालुका पातळीवर पाठ्यपुस्तके आल्यानंतर त्याठिकाणी गटविकास अधिकारी यांनी अधिकृतपणे तालुक्यातील प्रत्येक शाळेत पाठ्यपुस्तके पाठवण्यासाठी अधिकृतपणे वाहतुकीचे टेंडर काढून ती पाठ्यपुस्तके शाळा पातळीवर पाठवण्याचे आदेश जिल्हा पातळीवरून शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी काढले आहेत. त्यानुसार शाळा स्तरावर पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके पाठवण्याची जबाबदारी संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

शतप्रतिशत पुरवठा
जिल्ह्यात मोफत पाठ्यपुस्तके योजनेत आतापर्यंत जवळपास सर्वच तालुक्यात शंभर टक्के पुस्तकांचा पुरवठा झाला असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. काही तालुक्यातील पाठपुस्तके पुरवठा करणार्‍या शेवटच्या गाड्या प्रवासात असून त्या आज- उद्या तालुका पातळीपर्यंत पोहचणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. दुसरीकडे शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत गणवेशाचा पुरवठा होण्याची शक्यता धूसर असल्याचे सांगण्यात आले. गणवेशासाठी अनेक तालुक्यांत कापडाचा पुरवठा झालेला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या