Saturday, May 4, 2024
Homeनगरनिर्बंधांमध्ये शिथीलता अशक्य

निर्बंधांमध्ये शिथीलता अशक्य

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद करण्याबाबत आदेश काढण्यात आले असले तरी याला काही व्यापारी संघटनांनी विरोध केला आहे.

- Advertisement -

निर्बंध शिथील करावेत अशी मागणी संघटनांनी केली आहे. राज्यासह जिल्ह्यात वाढत असलेल्या करोना संसर्गामुळे निर्बंध घातलेले आहेत. निर्बंधांचा विचार शासन स्तरावर होईल. परंतु जे निर्बंध लागू केले आहेत, याचे पालन करणे सध्यातरी करोनाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

वाढत्या करोनामुळे जिल्हा प्रशासनाने आदेश काढून काही निर्बंध लागू केले आहेत. यातून आरोग्य सेवा, किराणा दुकाने, फळे- भाजीपाला, शेतीचे कामे, सार्वजनिक सेवा, मालवाहतूक, पेट्रोलपंप खुले असणार आहे. बाकी आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. आस्थापना सुरू असल्यास त्यावर पोलीस व पालिका पथक कारवाई करणार आहे. तसे आदेश संबंधितांना दिले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.

करोना रुग्ण उपचारासाठी आल्यावर त्याच्याकडे डिपॉझिटची मागणी केल्यास किंवा अवास्तव बिल आकारणी केल्यास अशा रूग्णालयावर कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील रूग्णालय प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी यांनी बोलविली आहे. तालुकास्तरावर बीडिओ व महापालिका स्तरावर आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करोना रूग्णांचे बिलाचे ऑडिट केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली.

यांना परवानगी…

राज्य सरकाच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधांमध्ये काही सुधारणा केल्या आहेत. यात संचार बंदीच्या काळात निर्बंधांत प्रवास करणार्‍या व्यक्तींना प्रवासाचे अधिकृत तिकीट सोबत ठेवून घरी अथवा स्थानकापर्यंत जाता येणार आहे. यासह औद्योगिक कामगारांना त्यांचे ओळखपत्र सोबत ठेवावे लागणार असून परीक्षार्थींना हॉल तिकीट सोबत ठेवावे लागणार आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये पेट्रोल, कार्गो सेवा, आपत्तकालीन सेवा काळात पुरवठादार फळ विक्रेते यांना घेण्यात आले आहे. यासह सहकारी, सार्वजनिक आणि खासगी बँक कर्मचारी यांना वगळ्यात आले असले तरी त्यांनी 15 दिवसांत लसीकरण करावे, तसेच वकिलांचे कार्यालय, कस्टम हाऊस एजंट, मायक्रो फायनान्स यांच्या कर्मचार्‍यांना शिथीलता राहणार आहे.

– पेट्रोल पंप, कार्गो सेवा सुरू राहणार

– फळविक्रेत्यांना व्यवसाय करण्यास मुभा

– बस प्रवाशांना तिकीट बाळगावे लागणार

– औद्योगिक कामगारांना ओळखपत्र बंधनकारक

- Advertisment -

ताज्या बातम्या