Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याविधानपरिषद मतदारसंघाची पुनर्रचना आवश्यक; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची अपेक्षा

विधानपरिषद मतदारसंघाची पुनर्रचना आवश्यक; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची अपेक्षा

मुंबई | प्रतिनिधी

विधानपरिषदेच्या मतदारसंघांची पुनर्रचना आवश्यक असून विधानपरिषदेत प्रतिनिधीत्व कुणाला असावे याबाबतीत सुद्धा नव्याने मांडणी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी येथे केले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरषदेवर निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या वाढवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्ताने विधानपरिषदेच्या आजी आणि माजी सदस्यांचा स्नेहमेळावा तसेच परिसंवाद कार्यक्रम आज विधानभवन येथे पार पडला. त्यावेळी बोलताना वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेचे महत्व विशद केले.

विधानपरिषद ही महत्वाची व्यवस्था लोकशाहीला बळकट करणारी असून ती अबाधित राहणे आवश्यक आहे. विधानपरिषदेने पुरोगामी विचार रुजविण्याचे काम केले, असेही त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रतिनिधी जिल्ह्यातून निवडून यावा जेणेकरून प्रत्येक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व सभागृहात दिसेल, असेही ते म्हणाले.

विधानपरिषदेत ७८ पैकी २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधीत्व करतात. मी तळागाळातून सामाजिक कार्य सुरु केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेले कार्यकर्ते यांना त्या भागाची आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची चांगली जाण असते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतून जास्तीत जास्त सदस्य विधानपरिषदेवर आले पाहिजेत. त्यांच्यासाठी असलेली सदस्यांची संख्या वाढवली पाहिजे, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली.

सुरुवातीला विधानपरिषदेचा सदस्य म्हणून या सभागृहात संसदीय आयुधांचा वापर करून जनतेचे प्रश्न नेमकेपणाने मांडण्याचे कौशल्य शिकलो. त्या काळातील नितीन गडकरी आणि ॲङ गुरुनाथ कुलकर्णी यांच्यामधील खेळीमेळीच्या वातावरणातील वाद-प्रतिवाद असतील किंवा सभागृहातील इतर विषयांवरील अभ्यासपूर्ण चर्चा असेल त्या ऐकण्यासारख्या होत्या. माथाडी कामगारांचा कायदा करण्याचे श्रेय विधानपरिषदेला जाते. विधानपरिषदेत कधीच कोणतेही विधेयक अडवले गेले नाही. दोन्ही सभागृहांनी प्रतिष्ठा जपण्याचे विधानपरिषदेने केले, असे वडेट्टीवार म्हणाले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या