Saturday, September 26, 2026
Homeक्राईमRobbery News : सेवानिवृत्त नायब तहसिलदाराच्या घरावर दरोडा

Robbery News : सेवानिवृत्त नायब तहसिलदाराच्या घरावर दरोडा

नेवाशातील भेंडा येथील घटना || 8 तोळे सोने तसेच मोबाईलसह 31 हजारांची रोकड लुटली

भेंडा |वार्ताहर| Bhenda

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार मच्छिंद्र यशवंत बर्डे यांच्या भेंडा-तरवडी रस्त्यावरील वस्तीवर मंगळवार दि.10 रोजी पहाटे दरोडेखोरांनी दरोडा टाकून 31 हजार 200 रुपयांची रोख रक्कम व जवळपास 8 तोळे (7 तोळे 9 ग्रॅम) सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत जयश्री दौलत बर्डे (वय 33), रा.बर्डे वस्ती, भेंडा शिवार ता. नेवासा यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.9 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आम्ही सर्व जेवण करुन मी माझे पती व मुलगी माझे बेडरुम मध्ये झोपलो होतो.

- Advertisement -

रात्री 10 रोजी अंदाजे 2 वाजण्याच्या सुमारास सासू विमलबाई यांचा आरडा-ओरड करण्याचा आवाज आला. सासू ओरडत होत्या की घरात कोणीतरी घुसले आहे. तेव्हा माझे पती यांनी सासु-सासरे यांचे रुममध्ये जात बघितले असता कोणीतरी बाहेरुन दरवाजा तोडण्याच प्रयत्न करीत होते. माझे पती यांनी सासू-सासरे यांना आमचे बेडरुममध्ये आणले व आमचे घरातील परवाना असलेली रायफलचा धाक दाखवून घरात घुसलेल्या दरोडेखोरांना घाबरविण्याचा प्रयत्न केला. परंतु घरात अचानक 4 ते 5 दरोडेखोर घुसल्याने त्यापैकी एकाने त्याचे हातातील पिस्टल सदृष्य वस्तूने माझे पती यांना धाक दाखवून पती यांचे हातातील रायफल हिसकावून घेतली व त्यांच्यापैकी एकाने त्याचे हातातील चाकूच्या मागच्या बाजुने माझे पती यांचे डाव्या डोळ्याच्या वर कपाळावर मारहाण केली.

त्यानंतर ते सर्व 5 इसम आमच्या बेडरुमध्ये आले, त्यापैकी एकाने त्याचे हातातील चाकूचा आम्हाला धाक दाखवून शांत राहण्याचा इशारा करत होता. त्यांच्या पैकी तिघांनी माझे पती यांचे हात-पाय बांधून त्यांना बेडवर झोपवून दिले. सासरे व मुलगी यांना देखील बेडच्या एका बाजुला व सासू यांना बेडच्या खाली बसविले. त्यापैकी एकाने मला चाकू दाखवून घरातील कपाटाच्या चाव्या मागितल्याने मी घाबरुन कपाटाच्या चाव्या त्यांना दिल्या. कपाटाच्या चाव्या मिळाल्यावर घरातील आमच्या बेडरुम मधील सर्व कपाट उघडून सोन्याचे दागीने व काही रोख रक्कम काढुन घेतली. त्यानंतर सासू विमलबाई यांचे रुम मधील कपाटाच्या चाव्या घेवून त्यांचे रुम मधील कपाट उघडून त्यातील सोन्याचे दागीने व रोख रक्कम देखील काढुन घेतली.

घरात घुसलेल्या इसमांपैकी काही हिंदी भाषेत व काही मराठी भाषेत बोलत होते. त्यानंतर देखील त्यांनी मला चाकूचा धाक दाखवून अजुन कुठे काही ठेवले आहे का? असे विचारले त्यावर मी त्यांना नाही म्हणाले असता त्यांनी आमचे सर्वांचे मोबाईल ताब्यात घेतले. घरातुन काढून घेतलेले दागीने एका टॉवेलमध्ये गुंडाळून माझे पती यांचे बॅगमध्ये टाकून घरातील रायफल सोबत घेवून घराचे सर्व दरवाजे बाहेरुन बंद करुन सुमारे 3 वाजेचे सुमारास ते सर्व घरातून निघून गेले. या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 310(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार पुढील तपास करीत आहेत.

दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत यशवंत बर्डे यांच्या हाताला तर गणेश बर्डे याचे हात, कपाळ व डोळ्याला मार लागून जखमा झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी फॉरेन्सिक टीम व श्वान पथकला घटनास्थळी पाचारण केले. श्वान पथकाने माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही. शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने ही घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान, आमदार विठ्ठलराव लंघे यांनी घटनास्थळी भेट देऊन बर्डे कुटुंबियांची विचारपूस केली. संबंधित पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा करून चोरीचा वेगाने व सखोल तपास करून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना दिल्या.

चोरीस गेलेला मुद्देमाल
4 ग्रॅम वजनाचा सोन्याचा पिळा, 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, 5 ग्रॅम वजनाचे सोन्याची मंचली,5 ग्रॅम सोन्याचा पिळा (25 हजार रुपये), 5 ग्रम वजनाची सोन्याची अंगठी (25 हजार रुपये),12.5 ग्रॅम सोन्याची कर्णफूले, 2.50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल, 8 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, 2 गॅ्रम वजनाचे सोन्याचे कानातले, सासरे मच्छिंद्र बर्डे यांचा 10 हजार रुपये किमतीचा व्हीवो कंपनीचा मोबाईल, 31 हजार 200 रुपये रोख रक्कमे सह पतीच्या पाकिटातील आधार, पॅनकार्ड व इतर कागदपत्रे असा ऐवज चोरीला गेला आहे.

रायफल उसात मिळाली
गणेश बर्डे याने घरातील रायफल काढून दरोडेखोरांना धाक दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोरांंनी गणेशच्या कपाळावर टणक वस्तूने मार देऊन रायफल हिसकावून घेतली. हातातील धारदार हत्यारे व गावठी कट्ट्यांचा धाक दाखवून दरोडेखोरांनी सोने चोरून नेले. जाताना बर्डे यांची परवाना असलेली रायफल घेऊन गेले, सकाळी घराशेजारील उसात ती रायफल आढळून आली.

ताज्या बातम्या

Trimbakeshwar Simhastha News : त्र्यंबकेश्वरमध्ये तयारीला वेग; सिंहस्थाच्या ध्वजारोहण समारंभास राष्ट्रपती...

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar महाराष्ट्रातील नागा साधूंचे एकमेव कुंभमेळा क्षेत्र आणि सिंहस्थ कुंभमेळ्याचे मुख्य केंद्र असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे आगामी कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची उत्सुकता...