Tuesday, May 21, 2024
Homeनगरचोरीला गेलेले दागिने मिळाले परत

चोरीला गेलेले दागिने मिळाले परत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घरफोडी करून चोरून नेलेला मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करून तो फिर्यादीस मिळवून देण्याची कामगिरी कोतवाली पोलिसांनी केली आहे. चोरीला गेलेल्या साडेदहा तोळे सोन्याच्या दागिन्यांपैकी फिर्यादीला दोन लाख 73 हजार रुपये किमतीचे साडेसहा तोळे परत मिळाले आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, गणेश रामदास लालबागे (वय 32 वर्षे रा. दर्शनकृपा, डी-1, रेल्वे स्टेशनरोड, आनंदनगर, अहमदनगर) यांच्या घरी घरफोडी करून चोरट्यांनी साडेदहा तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी लालबागे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज महाजन यांनी करून घरफोडी करणारे आरोपी किशोर तेजराव वायाळ (वय 45 रा. मेरा बुद्रुक, ता. चिखली, जि. बुलढाणा), गोरख रघुनाथ खळेकर (वय 34 रा. देवळाली चौक, सातारा परिसर, औरंगाबाद मूळ रा. शिरसवाडी ता. जि. जालना) यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली देताच पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले साडेसहा तोळ्याचे सोन्याचे दागिने जप्त केले.

न्यायालयाच्या परवानगीनंतर ते फिर्यादी लालबागे यांना देण्यात आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. सदरची कामगिरी नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे, उपनिरीक्षक महाजन, पोलीस अंमलदार दीपक साबळे, बंडू भागवत, याकूब सय्यद, सुमित गवळी व दीपक कैतके यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या