Tuesday, October 6, 2026
HomeनगरAhilyanagar : महसूल सहाय्यकांसह शेतकर्‍यांचे अ‍ॅप हँग!

Ahilyanagar : महसूल सहाय्यकांसह शेतकर्‍यांचे अ‍ॅप हँग!

ई-पिक पाहणीचा सर्व्हर डाऊन || जिल्ह्यात अवघी 35 टक्के नोंदणी पूर्ण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यावर यंदा दुष्काळाचे सावट असताना खरीप हंगामातील पिकांची अवस्था बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत पीकविमा, नुकसानभरपाई आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी ई-पिक पाहणीची नोंद महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या ई-पिक पाहणीला तांत्रिक अडथळ्यांचा विळखा पडला असून जिल्ह्यात आतापर्यंत अवघी 35 टक्केच ई-पिक पाहणी पूर्ण झाली आहे. त्यातच महसूल सहाय्यकांसह शेतकर्‍यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले मोबाइल अ‍ॅप वारंवार हँग होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

- Advertisement -

गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात ई-पिक पाहणीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी महसूल विभागाने खासगी व्यक्तींची महसूल सहाय्यक म्हणून नियुक्ती केली असून संबंधितांना ठराविक शेती क्षेत्र निश्चित करून देण्यात आले आहे. सुरुवातीला या सहाय्यकांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन ई-पिक पाहणीचे काम वेगाने सुरू केले. मात्र, तलाठी आणि कृषी सहाय्यकांच्या आंदोलनामुळे या कामावर परिणाम झाला. मागील आठवड्यात जिल्हा प्रशासनाने समजूत काढल्यानंतर तलाठी आणि कृषी सहाय्यकांनी काम सुरू केले. दरम्यान, राज्य शासनाने दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिल्याने महसूल, कृषी आणि ग्रामविकास यंत्रणेवरील कामाचा ताण आणखी वाढला आहे.

परिणामी ई-पिक पाहणीचे काम काही प्रमाणात मागे पडले आहे.त्यातच शेतकर्‍यांना स्वतः ई-पिक पाहणी करता यावी, यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले मोबाइल अ‍ॅपही तांत्रिक अडचणींच्या विळख्यात सापडले आहे. दिवसभर अ‍ॅप उघडत नाही, उघडले तरी त्याचा वेग अत्यंत कमी असतो. पिकांची माहिती भरल्यानंतर ती अपलोड होत नाही, फोटो अपलोड करण्यात अडथळे येतात, अशा तक्रारी शेतकर्‍यांकडून होत आहेत. महसूल सहाय्यकांसाठी देण्यात आलेले अ‍ॅपही अनेकदा काम करत नसल्याने प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करूनही ऑनलाइन नोंदणी पूर्ण करता येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे एकीकडे ई-पिक पाहणी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू असताना दुसरीकडे तांत्रिक अडचणींमुळे कामाचा वेग मंदावला आहे.

शासनाच्या उद्देशालाच तांत्रिक अडथळ्यांचा हरताळ
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच पावसाची अनिश्चितता राहिली. अनेक भागांत पावसाने मोठा खंड दिल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत पीकविमा, नुकसानभरपाई आणि विविध शासकीय योजनांचा लाभ देताना ई-पिक पाहणीची नोंद महत्त्वाची ठरणार आहे. शेतकर्‍यांना स्वतःच्या मोबाइलवरून ई-पिक पाहणी करता यावी, यासाठी शासनाने नवीन अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. फार्मर आयडीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना स्वतःच्या पिकाची नोंद करता येणार असून महसूल सहाय्यकांवरील अवलंबित्व कमी करण्याचा शासनाचा उद्देश आहे. मात्र, अ‍ॅपच हँग होत असल्याने शासनाच्या या प्रयत्नालाच तांत्रिक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

सातबारावरही नोंद उमटेना
ई-पिक पाहणीची नोंद मोबाइलवरून करण्याच्या प्रक्रियेत अनेक शेतकर्‍यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोबाइल अ‍ॅपचा वापर, आवश्यक माहिती भरणे, प्रत्यक्ष शेतातील पिकांचे फोटो घेणे आणि ती माहिती ऑनलाइन अपलोड करणे या प्रक्रियेत अडथळे येत आहेत. ई-पिक पाहणीची नोंद सातबारा उतार्‍यावर प्रतिबिंबित होणेही शेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मात्र, अनेक ठिकाणी नोंद करूनही सातबारा उतार्‍यावर पीक नोंद उमटत नसल्याच्या तक्रारी आहेत. पीकविमा, नुकसानभरपाई तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ देताना पिकांच्या नोंदीचा आधार घेतला जात असल्याने ही तांत्रिक समस्या दूर करून ई-पिक पाहणीची प्रक्रिया सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी 369 उमेदवारी अर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या महिन्याभरापासून गाजत असलेल्या अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. 5) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 903 अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज...