अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महसूल विभागातील रखडलेल्या पदोन्नती अखेर मंगळवारी जाहीर करण्यात आल्या आहेत. संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांची अहिल्यानगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. मागील काही महिन्यांपासून रिक्त असलेले हे पद अखेर भरले जाणार आहे. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कुलसचिव पदी पदोन्नती मिळाली आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे येथे महाव्यवस्थापक पदी पदोन्नती मिळाली आहे. तसेच माहिती व जनसंपर्क अधिकारी डॉ. किरण मोघे यांना पुणे येथे माहिती व जनसंपर्क कार्यालयात उपसंचालकपदी पदोन्नती मिळाली आहे.
जानेवारी 2025 मध्ये तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्ती झाल्यापासून अतिरिक्त जिल्हाधिकारी हे पद रिक्त होते. आता हिंगे यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा प्रशासनाला अनुभवी नेतृत्व लाभणार आहे. दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांची पदोन्नती महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कुलसचिव पदावर झाली आहे. पाटील यांनी यापूर्वी दोन वेळा – ऑगस्ट 2014 ते जून 2017 आणि ऑक्टोबर 2022 ते एप्रिल 2025 – या कालावधीत अहिल्यानगरचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे येथे महाव्यवस्थापक पदावर झाली आहे. पाटील यांनी एप्रिल 2023 ते एप्रिल 2025 या दोन वर्षांच्या कार्यकाळात लोकसभा व विधानसभा निवडणुका यशस्वीरित्या पार पाडल्या. जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी डॉ. किरण मोघे यांना पुणे विभागीय माहिती कार्यालयात उपसंचालक पदावर पदोन्नती मिळाली आहे. यासोबतच त्यांच्याकडे नाशिक विभागीय उपसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही असणार आहे.
डॉ. मोघे यांनी जिल्ह्यातील निवडणुकांचे दस्तऐवजीकरण, विशेषतः 1951 पासूनच्या विधानसभा निवडणुकांची पूर्वपिठीका तयार करण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. या पदोन्नतीमुळे संबंधित अधिकार्यांच्या अनुभवाचा फायदा नव्या जबाबदार्यांमध्ये निश्चितच होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.