Friday, November 22, 2024
Homeनगरमहाविकास आघाडीकडून लाडक्या बहिणींचा घास हिरावून घेण्याचे पाप- ना. विखे

महाविकास आघाडीकडून लाडक्या बहिणींचा घास हिरावून घेण्याचे पाप- ना. विखे

लोणी |वार्ताहर| Loni

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत खोडा घालून लाडक्या बहिणींचा घास हिरावून घेण्याचे पाप महाविकास आघाडीचे नेते करीत असल्याचा आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. निवडणूक आयोगाने दोन महिने योजना बंद ठेवण्याचे आदेश दिले असले तरी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता यापुर्वीच जमा झाला आहे. डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यातच लाडक्या बहिणींना मिळणार आहे. योजेनला मिळालेल्या प्रतिसादामुळेच महाविकास आघाडीकडून योजनेबाबत केवळ दिशाभूल करण्याचे काम सुरु असल्याची टीका त्यांनी केली.

- Advertisement -

शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलीच धडकी भरली आहे. त्यामुळेच या योजनेमध्ये अडथळे आणण्याचे पाप त्यांच्याकडून सातत्याने सुरू आहे. योजना बंद पडावी म्हणून यापूर्वी आघाडीचे नेते न्यायालयात गेले. परंतु तिथेही त्यांना यश आले नाही. सत्तेत आल्यावर ही योजनाच बंद करण्याची भाषा त्यांच्याकडून सुरू झाली. आता तर निवडणूक आयोगाकडे जावून तक्रार केल्यामुळेच लाडक्या बहिणींना एक महिन्याकरिता योजनेतील रकमेपासून वंचित राहावे लागणार असले तरी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता महायुती सरकारने बहिणींच्या खात्यात जमा केला असल्याचे ना. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

संगमनेरचा निर्णय
महायुतीच्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार असल्याचे स्पष्ट करून संगमनेरच्या उमेदवारी बाबत लवकरच घोषणा होईल. उमेदवार कोणी असला तरी संगमनेरात परिवर्तन होणारच आहे. संगमनेरमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार तरी अद्याप कुठे फायनल आहे, असा उपरोधिक सवाल ना. विखे यांनी उपस्थित केला.

विरोधक वैफल्यग्रस्त
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी शिर्डी विधानसभा मतदार संघात वाढीव मतदार नोंदणीबाबत केलेल्या विधानावर भाष्य करताना मंत्री विखे पाटील म्हणाले, आघाडीमध्ये होत असलेली बिघाडी आणि योजनांच्या माध्यमातून महायुतीला मिळत असलेला जनाधार यामुळेच अशी विधानं वैफल्यग्रस्तेतून केली जात असल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या