मुंबई | Mumbai –
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येशी संबंधित अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयने आज
शुक्रवारी फेटाळला. या निकालाला ती उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. रियासोबतच तिचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा आणि कर्मचारी दीपेशसह आठ जणांनी जामिनासाठी अर्ज केला होता. यावर दोन दिवस सुनावणी झाल्यानंतर न्या. जी. बी. गौरव यांच्या एकल पीठाने जामीन देण्यास नकार दिला. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत भायखळा तुरुंगात बंद आहेत.
रियाच्यावतीने वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. आपण निर्दोष असून, कोणताही प्रकारचा गुन्हा केला नाही. आपल्याला गुंतवण्यात आले. तपास यंत्रणेकडून गुन्हा कबूल करण्यास भाग पाडण्यात आल्याचा दावा रियाने याचिकेत केला होता. रियाने अमली पदार्थांचे सेवन केले असले, तरी तिने तस्करांना मदत केल्याचे पुरावे नाही. मादक पदार्थांचे सेवन हा जामिनपात्र गुन्हा आहे. तसेच, तीन दिवस रियाची एनसीबी कार्यालयात चौकशी सुरू असताना, तिची उलट तपासणी करणारे अधिकारी हे पुरुष होते. कायद्यानुसार तिथे महिला अधिकारी उपस्थित असणे अनिवार्य होते, असा आरोपही या याचिकेतून करण्यात आला.
रियाची कारागृहातील पहिली रात्र
अटक झाल्यामुळे रिया चिंतेत आहे. अडीच वाजेपर्यंत ती जागीच होती. ती खूप अस्वस्थ होती. 1015 च्या बॅरेकमध्ये तिला ठेवण्यात आले. तिला रात्री 8 वाजता जेवण मिळाले. बॅरेकमध्ये ती रात्री 11 वाजेपर्यंत फिरली व शेवटी थकून रात्री जमिनीवर बसली आणि एक टक जमिनीकडेच पाहात होती. रात्री 12 च्या सुमारास रियाने अंथरूण टाकले. तिला एक उशी, चादर आणि चटई देण्यात आली होती.