नाशिक । प्रतिनिधी Nashik
पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे आणि यापुढेही राहील ही आपली भूमिका कायम असून कोणतीही शक्ती या भूमिकेस आव्हान देऊ शकणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज येथे केले.
भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंंकर यांची प्रकट मुलाखत व प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आज कॉलेजरोडवरील गुरुदक्षिणा हॉलमध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते. अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आ. देवयानी फरांदे, संयोजक श्वास फाऊंडेशन अध्यक्ष प्रदीप पेशकार, श्रीराम दांंडेकर, विजय चौथाईवाले आदींसह उद्योजक, शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकट मुलाखतीच्या दुर्मिळ कार्यक्रमाने नाशिककरांना परराष्ट्र व्यवहाराचे सखोल ज्ञानही यामुळे मिळाले.
डॉ. जयशंकर म्हणाले, कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये सुधारणा होऊ लागल्या आहेत. आता पाकव्याप्त काश्मीरमध्येही काही घटना घडू लागल्या आहेत. लोकांची मानसिकता बदलून भारताकडे कल वाढू लागला आहे. एक दिवस तोही भाग भारताशी जोडला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चीनच्या ताब्यात भारताच्या भूमीविषयी ते म्हणाले, चीनने भारताचा भूभाग बळकावला तो 1958 ते 1963 याकाळात. त्यावेळी जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. मात्र भारताचा हा भूभाग मोदी सरकारच्या काळात चीनने बळकावल्याचा कांगावा करत काँग्रेस नेहरूंच्या चुकांचे खापर मोदी सरकारवर फोडत आहे.
आज देशात दररोज 28 कि.मी. लांब महामार्ग आणि 14 कि.मी. लांब रेल्वेमार्गाचे काम होते. दहा वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट झाली. भारताच्या प्रगती आणि तंत्रज्ञानाचे संपूर्ण पॅकेज जनतेसमोर आहे. देशाचा जीडीपी सात टक्के आहे. प्रशासकीय कारभारात सुधारणा होऊन भ्रष्टाचारला आळा बसला आहे. त्यामुळे परराष्ट्रात भारताची प्रतिमा निश्चित उंंचावली आहे. मुस्लीम देशांत मंदिरासाठी जागा दिली जाते. हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. आत्मनिर्भर भारतामुळे औद्योगिक प्रगती होत आहे. संशोधनाला बळ दिल्याने पहिल्यांंंदा 5जीचा निर्माता भारत झाला आहे. यावेळी त्यांनी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. आभार अनिल भालेराव यांनी मानले.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकचे राजकीय महत्त्व वाढले आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या दौर्याची सुरुवात देवदर्शनाने झाली. काळाराम मंदिरात त्यांनी दर्शन घेतले.
आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर
ऊर्जा समृद्ध इराणच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवरील सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात स्थित, ओमानच्या आखातावरील चाबहार बंदर आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहत्ाूक कॉरिडॉर नावाचा रस्ता आणि रेल्वे प्रकल्प वापरून भारतीय मालाला लँडलॉक अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवेशद्वार प्रदान करणार आहे. भारत, इराण, अफगाणिस्तान, आर्मेनिया, अझरबैजान, रशिया, मध्य आशिया आणि युरोपमधील मालवाहतुकीसाठी बहु-मोल वाहतूक प्रकल्प भारत आणि इराणने 7,200 कि.मी. लांबीच्या कॉरिडॉरसाठी हे बंदर एक प्रमुख केंद्र राहणार आहे, असे डॉ. जयशंकर यांनी स्पष्ट केले.