शहादा । ता. प्र.
शहरातील कुकडेल भवानी चौक परिसरात किरकोळ कारणावरून उसळलेल्या दंगलीनंतर पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून 160 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत 32 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेतील संशयीत समाज कंटकांची धरपकड पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. दरम्यान दंगलप्रकरणी शहादा पोलीसात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. संशयीतांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहरातील कुकडेल भवानी चौक परिसरात काल किरकोळ वादातून दोन गटात दंगल उसळली होती. यात तुफान दगडफेक करण्यात आली होती. यात वाहने, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. शहरातील वातावरण चिघळू नये यासाठी पोलिसांतर्फे त्वरित यंत्रणा हलवीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. रात्री उशिरा पावतो दगडफेकीतील घटनेतील संशयितना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर घटनेतील अनेक संशयीतांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यात हफीजोमुद्दिन बद्रुद्दिन अन्सारी रा. भवानी चौक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ईद मिलादची मिरवणूक जात असताना भवानी चौकात मिरवणुकीतील व्यक्तींनी आम्हाला शिवीगाळ केली असा संशय घेत भवानी चौक परिसरात उभे असणार्या काही जणांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. या दगडफेकीत पाच जण जखमी झाले आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार संशयित कल्पेश भोई, गणेश ठाकरे, धनराज पाडवी व इतर 40 ते 50 संशयित इसमांविरुद्ध भादंवि कलम 307, 323, 120, 143, 147, 148 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील 12 पुरुष व एक महिला असे 13 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण करीत आहेत.