Sunday, November 24, 2024
Homeअग्रलेखवाढती बालगुन्हेगारी : गंभीर समस्या

वाढती बालगुन्हेगारी : गंभीर समस्या

कोयता घेऊन परिसरात दहशत माजवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या एका टोळीला पुणे पोलिसांनी नुकतीच अटक केली. राज्याच्या अनेक जिल्ह्यात कोयता गँग धुमाकूळ घालत असल्याचे वृत्त अधूनमधून प्रसिद्ध होते. नाशिक शहरही त्याला अपवाद नाही. एका कोयताधाऱ्याने गोदाकाठी चांगलाच हलकल्लोळ माजवला होता. त्यांचा हैदोस नवा नाही. राज्य विधिमंडळाच्या गेल्या वर्षीच्या अधिवेशनात तत्कालीन विरोधी पक्ष नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. या गँगवर कठोर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न विचारला होता. ही गँग कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान ठरत आहे.

पोलीस त्यांच्या परीने गँगची दहशत संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करतात. कोयता खरेदी करण्यासाठी पुणे पोलिसांनी आधार कार्डची प्रत देणे काही काळ बंधनकारक केले होते. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी गस्त घालण्याचे आदेशही दिले होते. तरीही ही गँग अधूनमधून डोके वर काढते. पुण्यातील घटना हे त्याचे ताजे उदाहरण. वाढती बालगुन्हेगारी ही गंभीर सामाजिक समस्या आहे. ज्याचे कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतात. बालगुन्हेगारीत महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या स्थानावर आहे. १२ ते १६ या वयोगटातील अडीचशेपेक्षा जास्त मुलांवर हत्याकांडासारख्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा गुन्हा दाखल आहे. याचा विचार आणि विश्लेषण जाणते आणि मानसतज्ञांनी करायला हवे. यावर उपाययोजना सुचवायला हव्यात. विशेषतः पालकांनी याची दखल घ्यायला हवी. अजाणत्या वयातील मुले सामाजिक परिस्थितीच्या संपर्कात उशीरा येतात. त्याआधी त्यांची जडणघडण कौटुंबिक पातळीवर होते.

- Advertisement -

त्या पातळीवरचे वातावरण, पालकांची मानसिकता, ते मुलांना देत असलेला वेळ, मुलांवर मूल्यसंस्कार करण्याची घेतलेली दक्षता यावर जडणघडणीचा हा महत्वाचा टप्पा अवलंबून असतो. दुर्दैवाने याच टप्प्यावर याची दक्षता घेतली जात नसल्याचे निरीक्षण मानसतज्ज्ञ नोंदवतात. समाजात बालगुन्हेगारीची घटना उघडकीस आली की गदारोळ होतो. चर्चा झडतात. त्या त्या प्रत्येकवेळी कौटुंबिक पातळीवर संवादाची, आपुलकीची आणि जिव्हाळ्याची वीण विसविशीत होत असल्याकडे हे तज्ञ समाजाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. कौटुंबिक पातळीवर भांडणे, सततचे वादविवाद, प्रसंगी मारहाण आणि परिणामी वाढत जाणारी आर्थिक अस्थिरता अशा वातावरणात वाढणारी मुले गुन्हेगारी प्रवृत्तीची बनण्याचा धोका जास्त असतो असे हे तज्ञ सांगतात.

यात भर पडते ती पालकांच्या आणि मुलांच्याही हातात असलेल्या समाजमाध्यमाची. दिवसभर नोकरी किंवा व्यवसाय आणि उरलेल्या वेळ मोबाईलमध्ये डोके घालून बसलेले पालक आणि मुले हे अलीकडच्या काळात घरोघरी आढळणारे चित्र नाकारता येऊ शकेल का? अनेक शहरांमध्ये लहान वयातील मुलांसाठी विविध संस्था संस्कार केंद्रे चालवतात. त्यांच्या बरोबरीने पालकांसाठी देखील तशी केंद्रे चालवण्याची आवश्यकता जास्त असल्याचे मत एका ज्येष्ठ विचारवंतांनी एकदा व्यक्त केले होते. त्यातील मर्म लक्षात घेण्याची गरज आहे. मूल एक चांगला माणूस घडावे, त्याचे भवितव्य सुरक्षित व्हावे आणि त्याचा कोणत्याही स्वरूपाच्या समाजविघातक कृत्यांमध्ये सहभाग वाढायला नको असेल तर त्यासाठी पालक, सामाजिक पालक, समाज आणि मानसतद्न्य, सामाजिक संस्था आणि कायदा सुव्यवस्थेला एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या