Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedरस्ते अपघात एक भीषण समस्या!

रस्ते अपघात एक भीषण समस्या!

शिर्डी | प्रतिनिधी

राज्यासाठी रविवार ‘अपघात वार’ ठरला आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली. मेंदूला मार लागल्यानं जागेवरच मेटे यांचा मृत्यू झाला. असं डॉक्टरांनी सांगितलं.

- Advertisement -

तसेच दुसऱ्या एका अपघातात एकाच कुटुंबातील ६ जण जागीच ठार झाले आहेत. बीड जिल्ह्यातील येथील पाटोदा-मांजरसूंबा रोडवर हा भीषण अपघात (Accident) झाला. हा अपघात एवढा भीषण होता, की आयशर टेम्पोच्या खाली स्विफ्ट कार घुसल्याने कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. यामुळे कारमध्ये कुंटुंबियातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

राज्यात २०२०च्या तुलनेत २०२१ मध्ये अधिक अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे. २०२० मध्ये लॉकडाऊन असतानाही राज्यातील अपघातांची संख्या २४ हजार ९७१ वर पोहचली होती. या अपघातांमध्ये ११ हजार ५६९ नागरिकांना प्राणांना मुकावे लागले, तर १३ हजार ९७१ लोक गंभीर जखमी झाले होते. याउलट २०२१ मधील जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत राज्यातील अपघातांमध्ये २६ हजार २८४ पर्यंत वाढ झाली आहे. याशिवाय संबंधित अपघातांमध्ये ११ हजार ९६० प्रवाशांचा हकनाक जीव गेला असून १४ हजार २६६ लोक गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान आपण जाणून घेऊयात अपघाताची कारण, अपघात टाळण्यासाठी घ्यायची दक्षता आणि अपघात झाला तर काय कराल?

अपघाताची कारण

अपघाताला प्रामुख्याने काही मानवी चुका जबाबदार आहे. अतिवेगाची नशा, हेल्मेट, सीट बेल्ट न वापरणे, धोकादायक ओव्हरटेकिंग/लेन कटिंग, मद्यपान करून गाडी चालविणे, गाडीत अनेक प्रवासी कोंबणे वा क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेणे, गाडी चालविण्याचे नीट प्रशिक्षण न घेणे वा वाहतूक नियमांचे अपुरे ज्ञान, चालकांवरील अतिताण, थकवा तसेच रस्त्यात कुठेही गाडी उभी करणे या कारणांमुळे बहुतेक अपघात होतात. त्याचबरोबर धुके किंवा मुसळधार पाऊस, प्रचंड उष्णता निर्माण झाल्याने टायर फुटणे, जनावर रस्त्यात आडवे येणे, पादचाऱ्यांची चूक, दरड कोसळणे, वाहतुकीची कोंडी यामुळेही अपघात घडतात.

अपघात टाळण्यासाठी घ्यायची दक्षता

अपघात टाळण्यासाठी नेहमी सीट बेल्ट वापरण्यात कमीपणा मानू नका, लेनची शिस्त नेहमी पाळा, आखून दिलेली वेगमर्यादा पाळा, महामार्गावर मदतीसाठी उभ्या असलेल्या वाहनाची मदत करा, गाडी चालविताना नेहमी सतर्क राहा, रात्रीच्या वेळी गाडी चालविताना पुढील व मागील दिवे, पार्किंग लाइट सुरू आहेत का याची तपासणी करा व सर्वात महत्वाचं वाहतूक नियम पाळा. तसेच मद्यपान करून गाडी चालवू नका, धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करू नका, कुठेही गाडी उभी करू नका, गाडीच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरू नका.

अपघात झाला तर काय कराल?

अपघात झाल्यास सर्वात आधी जखमी व्यक्तींना अपघात क्षेत्रातून बाहेर काढून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवा, त्यांचा श्वासोश्वास व हृदयाचे ठोके व्यवस्थित आहे का हे बघा. त्याचवेळेस दुसऱ्या कोणीतरी रुग्णवाहिकेला बोलवा व तसेच जवळच्या रुग्णालयाशी संपर्क करा. जर जखमी व्यक्तीचा श्वासोच्छवास होत नसेल/ हृदयाचे ठोके लागत नसतील तर त्याला आपल्या तोंडाने कृत्रिम श्वासोच्छवास द्या व त्याची छाती हाताने दाबून पंप करा. याला सीपीआर (CARDIO PULMONARY RESUSCITATION) म्हणतात. C.P.R. चं ट्रेनिंग हॉस्प‌टिलमध्ये दिलं जातं. हे ट्रेनिंग सर्वांनी घ्यायला हवं. जखमी व्यक्तीचा रक्तस्राव थांबवा. जखमा झाका व फ्रॅक्चर असल्यास त्या भागाला आधार देऊन त्याची हालचाल थांबवा. आधारासाठी तुम्ही पुठ्ठा, झाडाची फांदी, पट्टी अशा कडक वस्तूंचा वापर करू शकता. जखमीस पाणी देऊ नका. कारण जर लगेचच दवाखान्यात दाखल करून शस्रक्रियेची गरज असेल तर पाणी प्यायल्याने भूल देणं धोकेदायक होऊ शकतं व त्यामुळे भूल देणं व शस्रक्रिया करणं लांबवावे लागू शकतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या