अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते माळीवाडा वेस असा 600 मीटर लांबीच्या रस्त्यासाठी तीन कोटींचा निधी मंजूर झाला. मात्र, अवघ्या काही दिवसांत रस्ता खराब झाला आहे. प्रभारी बांधकाम विभागाने नोटीस काढल्याने ठेकेदाराने तत्काळ दुरूस्तीस सुरूवात केली आहे. शहरात सध्या मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे सुरू आहेत. नव्याने होणारे सर्वच रस्ते सिमेंट काँक्रिटचे होत आहेत. राज्याच्या समाजकल्याण निधीतून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते माळीवाडा वेस असा सिमेंट काँक्रिटीकरणाचा रस्ता मंजूर झाला होता.
त्यासाठी तीन कोटींचा निधीही मिळाला. रस्त्याचे कामही पूर्ण झाले. मात्र, अवघ्या काही महिन्यांत जिल्हा परिषद समोर हा रस्ता खराब झाला. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. बांधकाम विभागाचे प्रभारी अभियंता मनोज पारखे यांनी संबंधित ठेकेदाराला नोटीस काढून खुलासा मागविला व रस्ता दुरूस्त करून देण्याचा आदेश दिला. त्यानंतर बुधवारी संबंधित ठेकेदाराने रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेतले. शहरात अनेक रस्त्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने नियमाप्रमाणे साहित्य वापरावे. रस्त्याचा दर्जा टिकवावा. रस्ता खराब झाल्यास दुरूस्त करून घेण्यात येईलच पण दंडात्मक कारवाईला समोरे जावे लागेल, असा इशारा अभियंता पारखे यांनी दिला आहे.