अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मोढवे मळा, वाकोडी (ता. नगर) येथे जाण्या-येण्याच्या रस्त्याच्या कारणावरून वाद होऊन एका शेतकर्याला लोखंडी फायटरने मारहाण करून जखमी करण्यात आल्याची घटना घडली आहे. संतोष जगन्नाथ भोढवे (वय 42, रा. मोढवे मळा, वाकोडी) असे जखमी शेतकर्याचे नाव असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश गोरख मोढवे, गौरव दीपक मोढवे, स्वाती प्रकाश मोढवे, मंदाकिनी गोरख मोढवे आणि आशा दीपक मोढवे (सर्व रा. मोढवे मळा, वाकोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 28 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1:30 वाजता ही घटना घडली. संशयित आरोपींनी एकत्र येऊन फिर्यादीला शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये प्रकाश मोढवे याने लोखंडी फायटरने वार करत फिर्यादीच्या डाव्या डोळ्यावर जबर मार दिला, त्यामुळे फिर्यादी गंभीर जखमी झाले. त्याच्या मदतीला पत्नी आणि आई धावून आल्यावर संशयित आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी संतोष मोढवे यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांनी दिलेल्या जबाबावरून 1 मार्च रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.