Friday, May 3, 2024
Homeनगरपिकअप चालकाला 2 लाखाला लुटले

पिकअप चालकाला 2 लाखाला लुटले

नेवासा|तालुका प्रतिनिधी|Newasa

तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे नेवासा-शेवगाव रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल आडवी लावून 2 लाख रुपयांची लूट केल्याची घटना काल दुपारी घडली असून याबाबत चालक हरिदया सोपान आहेर रा.रामज पिंपळस,ता.निफाड याने नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, चांदोरी ता. निफाड, जि. नाशिक येथील गोकुळ प्लास्टिक या कंपनीचा महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच 15 पीव्ही 2680) प्लॅस्टिक मल्चिंग पेपर घेऊन लातूरला गेला होता. लातूर मध्ये मल्चिंग पेपर खाली करून बिलाची रोख रक्कम घेऊन पिकअप चालक रिकामे वाहन व पैसे घेऊन लातूरहून नाशिककडे जात असताना नेवासा तालुक्यातील भेंडा ब्रूद्रुक येथील माऊली दूध संकलन केंद्राजवळ नेवासा-शेवगाव मुख्य रस्त्यावर मंगळवार दि. 7 जुलै रोजी दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास पिकअपला अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल आडवी घालून पिकअप थांबवली.

चालकाकडील रोख 2 लाख रुपये व ड्रायव्हिंग लायसन्स काढून घेऊन पलायन केले. अज्ञात व्यक्ती मारहाण करून रोख 2 लाख रुपये घेऊन पळून गेल्यानंतर चालकाने कंपनीच्या मालकाला फोन करून घडलेली घटना सांगितली. मालकाने नेवासा पोलिसांशी संपर्क साधून घटनेची खबर दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपधीक्षक मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला शोधण्यासाठी वेगवेगळी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

तसेच या पिकअपचा कुठपासून पाठलाग झाला हे शोधण्यासाठी भेंडा व कुकाणा येथील मुख्य रस्त्यावरील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी तपासले. मात्र संशयास्पद असे काही आढळून आले नाही.खरोखरच लूट झाली की लुटीचा बनाव निर्माण केला या बाजूनेही तपास पोलीस करत आहेत. पिकअप चालकाचीही कसून चौकशी केली जात आहे.

पोलीस उपधीक्षक मंदार जवळे हे पोलीस फौज फाट्यासह रात्री उशिरापर्यंत तपास करत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या