अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते-साहित्यिक व येथील सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब रामचंद्र कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना नगर शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात वावरणार्या रोडरोमिओंवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. एलसीबी पथकाने बुधवारी सकाळपासून नगर शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात भेट देऊन रोडरोमिओंवर कारवाई केली.
हेरंब कुलकर्णी हे सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत. विद्यालय परिसरात येणार्या गुटख्याच्या टपरीची तक्रार मनपाकडे केल्याच्या रागातून त्यांच्यावर मागील शनिवारी हल्ला झाला. यामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे समोर आले. यापार्श्वभूमीवर अधीक्षक ओला यांनी शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात वावरणार्यांवर कारवाई करण्याचे आदेश एलसीबी पथकाला दिले आहेत.
पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार राजेंद्र वाघ, सुनील चव्हाण, लक्ष्मण खोकले, भिमराज खर्से, सागर ससाणे आदींच्या पथकाने बुधवारी सकाळी नगर शहरातील सारडा विद्यालय, नगर कॉलेज, न्यू आर्ट्स कॉलेज परिसरात भेट देऊन रोडरोमिओंवर कारवाई केली. सुमारे 22 जणांना ताब्यात घेण्यात आले. हे सर्व युवक शाळा, कॉलेज परिसरात मुलींची छेड काढले, मुलींच्या पार्किंग परिसरात थांबणे, कॉलेज परिसरात वेगात वाहने चालविणे असे कृत करताना मिळून आले. त्यांना तोफखाना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याविरूध्द भादंवि 110, 117 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.