Monday, June 24, 2024
Homeअग्रलेखदर्जेदार रस्ते म्हणजे कापूसकोंड्याची गोष्ट?

दर्जेदार रस्ते म्हणजे कापूसकोंड्याची गोष्ट?

राज्यातील रस्ते, त्यांची अवस्था-दुरवस्था हा सर्वाधिक चर्चेचा आणि राजकारणाचा मुद्दा बनला आहे. रस्ता गल्लीतील असो अथवा महामार्ग त्याची दुरवस्था सारखीच आढळते. महामार्गही खड्ड्यात आणि गल्लीतील रस्ताही गाळात हाच जनतेचा अनुभव असतो. गल्लीतील रस्ता दुरुस्त करावा यासाठी अहमदनगरच्या केडगावमधील विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. तसे पत्र पाठवले आहे.

- Advertisement -

रस्त्याच्या दुरवस्थेचा त्यांच्या वडिलांना होणारा त्रास मुलांनी त्या पत्रात लिहिला आहे. त्यांचे साठवलेले खाऊचे पैसे वापरावेत पण रस्ता दुरुस्त करावा अशी विनंती मुलांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. हे पत्र माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. कुठून-कुठपर्यंतचा रस्ता बनवून हवा आहे त्याचाही उल्लेख मुलांनी पत्रात केला आहे. तीच राज्यातील जनतेची देखील मागणी आहे. मुलांना तरी त्यांच्याच परिसरातील रस्ता बांधून हवा आहे. पण निदान मोठ्या आणि महामार्गाचा तरी दर्जा राखला जावा एवढीच लोकांची अपेक्षा आहे. राज्यातील कुठला ना कुठला रस्ता किंवा महामार्ग खड्यातच असतो. लोकांची मान-पाठ एक आणि त्यांच्या गाडीचा खुळखुळा करत असतो. ग्रामीण भागातील रस्त्यांविषयी तेथील लोकांनी काय बोलावे? राज्यातील शेकडो वाड्या आणि वस्त्या बिनरस्त्याच्या आहेत अशी तक्रार नेहमीच केली जाते. ठाणे जिल्ह्यातील बालमृत्यू कमी व्हावेत या उद्देशाने गरोदर माता, महिला आणि अर्भके याना तातडीने रुग्णालयात नेणे शक्य व्हावे यासाठी रुग्णवाहिका पुरवण्याचे आदेश राज्य शासनाने नुकतेच काढले. उद्देश स्वागतार्हच. पण ठाणे जिल्ह्यातील १६ महसुली गावे आणि ७५ वाड्या वस्त्यांना बारमाही रस्तेच नाहीत अशी माहिती बांधकाम विभागानेच माध्यमांना दिली. यावरून राज्यातील ग्रामीण भागाची कल्पना यावी. राज्यातील रस्ते हा राजकीय पक्षांचा बारमाही आंदोलनाचा विषय आहे.

पक्षाकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही, करा सुरु रस्ते आंदोलन असाच खाक्या लोकांच्या अनुभवास येतो. याच मुद्यावर छोटे-मोठे राजकीय पक्ष वर्षानुवर्षे कार्यकर्ते आणि लोकांना वेड्यात काढत असावेत का? नेहमी विरोधी पक्षांनाच लोकांची रस्ते समस्या कशी जाणवते? राज्यातील विरोधी पक्ष कधी ना कधी सत्तेत येतातच. तरीही लोकांना खड्डेमुक्त रस्ते का मिळत नाहीत हे कोडे लोकांना अजूनही सुटलेले नाही. सर्वच राजकीय पक्षांना दर्जेदार रस्ते बनवण्यात रस का नसावा या प्रश्नानेही त्यांना सतावले आहे. साखळी बांधा-तोडा, काहीही करा पण लवकर खराब न होणारे रस्ते बांधून द्या एवढेच लोकांचे मागणे आहे. तथापि ते मागणे म्हणजे कापूसकोंड्याची गोष्ट बनले असावे का? रस्ते बांधून द्या.. रस्ते बांधून द्या काय म्हणता कापूस कोंड्याची गोष्ट सांगू का? रस्ते खराब झाले काय म्हणता कापूस कोंड्याची गोष्ट सांगू का? रस्ते खड्ड्यात गेले काय म्हणता, कापूसकोंड्याची गोष्ट सांगू का? असे हे चर्हाट अजून किती काळ लांबत जाणार कि लांबवले जाणार हे कोण सांगू शकेल का?

- Advertisment -

ताज्या बातम्या