Monday, September 28, 2026
HomeनगरCrime News : अंगदुखीवर उपाय सांगत ‘टिंग्या’ने लुटले 25 तोळे सोने

Crime News : अंगदुखीवर उपाय सांगत ‘टिंग्या’ने लुटले 25 तोळे सोने

गुरूच्या विधीच्या नावाखाली महिलेची फसवणूक || गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अंगदुखी व मधुमेहाचा त्रास बरा करून देण्याचे आमिष दाखवत ‘गुरू’कडून विशेष विधी करून सोन्याची नथ तयार करून देण्याचे सांगून एका विवाहितेकडून तब्बल 25 तोळे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गणेश ऊर्फ टिंग्या मसुदेव पोटे व त्याची पत्नी वर्षा गणेश पोटे (दोघे रा. रेल्वे स्टेशन, अहिल्यानगर) यांच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

भुतकरवाडी परिसरात राहत असलेल्या 44 वर्षीय महिलेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांना मधुमेहामुळे अंगदुखीचा त्रास होत होता. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्या त्यांच्या वडिलांच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना भेटण्यासाठी माहेरी रेल्वे स्टेशन रोड परिसरात गेल्या होत्या. त्यावेळी दूध घेण्यासाठी आलेल्या गणेश पोटे याने त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. आपण मढीहून आलो असून गुरूंनी दिलेली विभूती (पावडर) औषध म्हणून देत असल्याचे सांगून ती दररोज पाण्यातून घेण्याचा सल्ला दिला. त्याचवेळी त्याने 50 हजार रूपयांची मागणी केली. फिर्यादीने आईकडून पैसे घेऊन त्याला दिल्याचा आरोप आहे. त्याने फिर्यादीचा मोबाईल क्रमांकही घेतला.

काही दिवसांनी गणेश पोटे याने फोन करून विभूतीचा परिणाम झाला का, अशी विचारणा केली. फरक पडला नसल्याचे सांगितल्यानंतर त्याने आपल्या गुरूकडून विशेष विधी करून सोन्याची नथ तयार करून दिल्यास सर्व आजार बरे होतील, असे आमिष दाखविले. फिर्यादीने सोने नसल्याचे सांगितल्यानंतर त्याने वारंवार फोन करून सोने मागण्यास सुरूवात केली. गणेश पोटे याने सोने दिले नाही तर माझा गुरू तुझ्या नवर्‍याला रक्ताच्या उलट्या करून मारून टाकेल, अशी धमकी देत भीती निर्माण केली. त्यामुळे त्यांनी ही बाब घरच्यांपासून लपवून ठेवली.

यानंतर भुतकरवाडी येथील महादेव मंदिराजवळ अनेक वेळा बोलावून गणेश पोटे याने टप्प्याटप्प्याने दागिने घेतल्याचा आरोप आहे. त्यात पाच तोळ्यांचा सोन्याचा राणीहार, दोन तोळ्यांचा नेकलेस, तीन तोळ्यांचे कानातील झुबे, तीन तोळ्यांचे मंगळसूत्र असे एकूण 13 तोळे सोने घेतले. हे सर्व सोने गुरूकडे देऊन विधी करून नथ बनवून परत देणार असल्याचे त्याने सांगितले होते. आषाढी एकादशीपूर्वी आणखी विधीसाठी सोन्याच्या बांगड्यांची गरज असल्याचे सांगत गणेश पोटे याने फिर्यादीला पुन्हा महादेव मंदिरात बोलावले. तेथे त्याची पत्नी वर्षा पोटे उभी होती. तिच्याकडे 12 तोळ्यांच्या सहा सोन्याच्या बांगड्या देण्यास सांगितले. फोनवर गणेश पोटे याच्याशी बोलणे करून फिर्यादीने त्या बांगड्या वर्षा पोटे हिच्याकडे सुपूर्द केल्या. दोन-तीन दिवसांनी गणेश पोटे याने पुन्हा 70 हजार रूपयांची मागणी केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची फिर्यादीला खात्री झाली. यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली.

ताज्या बातम्या

Nashik News : आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी ‘उलगुलान’ मोर्चा मुंबईच्या दिशेने;...

0
नाशिक | Nashik आदिवासी विद्यार्थ्यांचे (Tribal Student) प्रलंबित प्रश्न आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सकल आदिवासी समाजाने पुकारलेला 'उलगुलान' मोर्चा सोमवारी...