श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर तालुक्यातील फत्त्याबाद येथील माजी सरपंच बाबासाहेब बाळाजी आठरे यांच्या घरी दोन दिवसांपूर्वी रात्री दरोड्याचा प्रयत्न झाला. यावेळी त्यांची सून हर्षदा हिने आरडाओरडा केल्यामुळे दरोडेखोर पळून गेले. परंतु या महिलेने आपल्याला ओळखले असावे असा समज झाल्याने अज्ञात आरोपींनी काल सायंकाळी हर्षदा व आठरे यांच्या पुतणीवर अॅसिड फेकण्याची घटना घडली. यात दोघीही काही प्रमाणात भाजल्या आहेत. या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली आहे.
फत्त्याबाद येथील बाबासाहेब आठरे कुटुंबिय रविवार दि. 20 एप्रिल रोजी रात्री 9.30 वाजता जेवण करून झोपी गेलेे. पहाटेच्या सुमारास दरोडखोर त्यांच्या घराचा बंद दरवाजा तोडून घरात घुसले. त्यांनी सर्वांच्या तोंडावर स्प्रे मारला. त्यावेळी त्यांची सूनबाई हर्षदा उदय आठरे ही बाथरूमला गेलेली होती. त्यादरम्यान दरोडेखोरांनी सर्व उचकापाचक सुरू केली. काही दागिन्याचे गाठोडे बांधले व सात हजार रुपये रोख रक्कम सोबत घेतली. नेमकी त्याच वेळेस बाथरुला गेलेली हर्षदा आठरे ही बाथरूम मधून बाहेर आली. घरात उचकापाचक करत असलेले दरोडेखोर पाहून तिने जोरात आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून शेजारीच असलेले आठरे यांचे पुतणे गणेश सुभाष आठरे व चेतन भागवत आठरे हे धावत आले. हे पाहून दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने असलेले गाठोडे वरून खाली फेकले व दुसर्या मजल्यावरून उड्या मारल्या.
जागे झालेले लोेक येत असल्याचे पाहून ते दागिन्याचे गाठोडे सोडून पळून गेले. परंतु या महिलेने आपल्याला पाहिल्याने तिने ओळखले असावे, असा चोरट्यांचा समज झाला. त्यामुळे हे दरोडेखोर दोन दिवसांपासून या महिलेच्या मागावर होते. सोमवारी त्यांनी हर्षदाला वीट फेकून मारली मात्र सुदैवाने ती थोडक्यात बचावली. काल हर्षदा आठरे ही आपल्या मुलीला घेऊन फत्त्याबाद येथे दवाखान्यात आली होती. सोबत बाबासाहेब आठरे यांची पुतणी ही देखील होती. दवाखान्यातून स्कुटीवरुन घराकडे परत येत असताना दोन जण मोटरसायकलवरुन आले.त्यांनी स्कुटीवर चाललेल्या या दोन महिलांच्या अंगावर अॅसिड फेकले. त्यात हर्षदा हिची पाठ भाजली तर बाबासाहेब आठरे यांच्या पुतणीच्या छातीला भाजले आहे. त्यांना तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. सलग दोन दिवस या महिलेवर हल्ला झाल्याने आरोपी जवळपासचेच असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या चोरीबाबत बाबासाहेेब आठरेे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.