अहमदनगर |प्रतिनिधी\ Ahmednagar
भाळवणी (ता. पारनेर) परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. यामध्ये चौघांचा समावेश असून त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे. अमोल नवनाथ काळे (वय 23), शामुल उर्फ शौर्या नवनाथ काळे (वय 20, दोघे रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड), सतीश उर्फ मुन्ना लायलन भोसले (वय 19) व भरत अब्दुल भोसले (वय 40, दोघे रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड) अशी अटक केलेल्या चौघांची नावे असून त्यांचा साथीदार मोहन निकाजी भोसले (रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड) हा पसार झाला आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार बापूसाहेब फोलाणे, रवींद्र कर्डिले, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, देवेंद्र शेलार, संदीप दरंदले, भाऊसाहेब काळे, रोहित मिसाळ, अमोल कोतकर, आकाश काळे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व अरुण मोरे यांचे पथक जिल्ह्यातील दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींची माहिती काढत असताना नगर – कल्याण रस्त्यावरील भाळवणी शिवारातील हॉटेल ऋषिकेश जवळ काही संशयित इसम अंधारात थांबून कोठेतरी दरोडा घालण्याच्या तयारीत दबा धरून बसले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आहेर यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कळवून खात्री करून कारवाईचे आदेश दिले.
पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्यांना काही इसम दुचाकीसह अंधारात थांबलेले दिसले. पोलीस आल्याची चाहुल लागताच त्यांनी पळ काढला. पथकाने पाठलाग करून चौघांना पकडले तर एकजण पळून गेला. पकडलेल्या चौघांच्या ताब्यातून तीन मोबाईल, दोन दुचाकी, कोयता, लाकडी दांडके, सुती दोरी, मिरचीपूड असा एकूण तीन लाख 35 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरूध्द पारनेर पोलीस ठाण्यात दरोड्याचा तयारीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पकडलेल्या चौघांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी सोबलेवाडी (ता. पारनेर) व चास (ता. नगर) येथे घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.