Sunday, May 19, 2024
Homeनगरश्रीगोंदा पोलीसांकडून सराईत दोन दरोडेखोर जेरबंद

श्रीगोंदा पोलीसांकडून सराईत दोन दरोडेखोर जेरबंद

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

अहमदनगर, पुणे, सोलापूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यात रस्तेलूट, घरफोड्या सारखे गुन्हे करून धुमाकूळ घालणार्‍या दोन सराईत दरोडेखोरांना श्रीगोंदा पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असतानाच अचानक छापा टाकून जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून दरोड्याच्या साहित्यासह दोन मोटारसायकली असा मिळून 1 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि.25) श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामाराव ढिकले यांना गुप्त खबर्‍यामार्फत माहिती मिळाली की सराईत गुन्हेगार गहिनीनाथ उर्फ गहिन्या ईश्वर्‍या भोसले व त्याचे साथीदार अहमदनगर-सोलापूर महामार्गालगत मांडवगण फाट्यापासून बनपिंप्री ता. श्रीगोंदा येथील रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत जमा झाले आहेत. माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक ढिकले यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल सूर्यवंशी व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला कारवाई करण्यास सांगितले.

पथकाने संध्याकाळी 7 वाजता छापा टाकला असता सहा व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होत्या. पोलिसांना पाहून त्यांनी पोबारा केला मात्र गहिनीनाथ उर्फ ईश्वर्‍या भोसले (32) व सोन्या उर्फ लाल्या ईश्वर्‍या भोसले (28) दोघेही रा. बेलगाव ता. कर्जत) या दोघांना पाठलाग करून पकडण्यात यश आले तर चौघे फरार झाले. त्यांच्याकडून दोन मोटारसायकली मिरचीपूड, पान्हे,कटावणी, चाकू व रोख रक्कम मिळून असा 1 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. या दोन्ही गुन्हेगारांविरोधात अहमदनगर, सोलापूर, पुणे, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात दरोडे, घरफोडी, रोड रॉबरी असे तब्बल 26 गुन्हे दाखल आहेत. त्यात ते फरार होते. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित माळी व हवालदार वैभव गांगर्डे करत आहेत.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल सुर्यवंशी, उपनिरीक्षक अंकुश ढवळे, पोलिस नाईक गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, अमोल कोतकर, दादासाहेब टाके, दिपाली भंडलकर, प्रशांत राठोड यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या