Saturday, July 27, 2024
Homeनगरथरारक पाठलाग करून दरोडेखोरांची टोळी जेरबंद

थरारक पाठलाग करून दरोडेखोरांची टोळी जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील कायनेटिक चौकात बारामती येथे जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत थांबलेल्या चार कामगारांना जबर मारहाण करीत लुटणार्‍या दरोडेखोरांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद केले आहे. तिघांना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. गुन्हा करून रिक्षाने पळून जात असताना मध्यरात्री चार ते पाच किलोमीटर थरारक पाठलाग करून या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

- Advertisement -

स्वप्नील साळवे (वय 29), निरज पटारे (वय 19), रितेश शेंडगे (सर्व रा. शाहुनगर, केडगाव) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. प्रितम उर्फ पेप्या सावंत (रा. मोहिनीनगर केडगाव) हा संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे. मंगळवारी (दि. 29) पहाटे 1.30 वाजताच्या सुमारास पवन पैठणे, किरण गोफणे, अजय गोफणे, गोविंद गोफणे असे चौघे बारामती येथे जाण्यासाठी कायनेटिक चौकात वाहनाची वाट पाहत थांबलेले होते.

दरम्यान, 2.30 वाजता सहाजण तिथे रिक्षामधून (एमएच 12 बीडी 4613) आले व त्यांनी पवन पैठणे यांच्या तोंडावर फाईट मारून गळ्यातील चेन, खिशातील मोबाईल व दोन हजार रुपये रोख काढून घेतले. गोफणे यांना मारहाण करून त्यांचा मोबाईल फोन खिशातून काढून घेतला. आरोपींनी चौघांना मारहाण केली व सावंत याने कोयत्याने तुमचे हातपाय तोडून टाकील, अशी धमकी देत आरोपी रिक्षामधून पळून गेले होते. पैठणे (रा. तपोवन गोंधन, ता. जाफराबाद जि. जालना) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोतवाली पोलिसांना संशयित आरोपी केडगाव परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलीस आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले.

पोलिसांनी आरोपींचा सोनेवाडी ते बायपास रस्ता असा सुमारे चार ते पाच किलोमीटर पाठलाग करून जेरबंद केले. चोरीला गेलेल्या ऐवजासह गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व इतर असा 93 हजार 300 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, अंमलदार अशोक सरोदे, याकुब सय्यद, तानाजी पवार, सोमनाथ मुरकुटे, प्रशांत बोरूडे, मधुकर चव्हाण, सत्यम शिंदे, योगेश ठोंबे, होमगार्ड पाटसकर, मुर्तुजा सव्यद, शिंदे यांनी ही कारवाई केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या