नंदुरबार । nandurbar प्रतिनिधी
बंदुकीचा धाक दाखवून भालेर येथील शेतकर्यांना (farmers) लुटणारे (robbing) दरोडेखोर (Robbers)स्थानिक गुन्हे शाखेकडून (Lcb) 30 तासातच जेरबंद करण्यात आले असुन 21 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील सहा जण ठार ; सहा गंभीर
सुनिल गंगाराम पाटील व त्यांचा भाऊ हसंराज दगाजी पाटील दोन्ही रा- भालेर ता . नंदुरबार हे दोन्ही शेतकरी त्यांचा कापुस गुजरात राज्यातील कडी येथे विकुन दि. 10 मार्च 2023 रोजीच्या रात्री 1.30 वा. सुमारास दुचाकीने त्यांच्या घरी जात असतांना नंदुरबार शहरातील भालेर रोडचे होळ गावाकडे जाणार्या फाटयाजवळ त्यांच्या गाडीच्या पुढे एक पांढर्या रंगाची चारचाकी वाहनातून आलेल्या चार अनोळखी अनोळखी इसमांनी त्यांच्या दुचाकीसमोर पांढर्या रंगाचे चारचाकी वाहन आडवे लावून फिर्यादी व साक्षीदार यांच्या दिशेने मिरचीपूड भिरकावून 13 लाख 94 हजार रुपये रोख रक्कम बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने हिसकावून घेतले म्हणून सुनिल गंगाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 394,34 सह आर्म ऍक्ट 3/25 प्रमाणे अज्ञात आरोपीतांविरुध्द् गुन्हा दाखल आहे.
सदर घटनेची माहिती पोलीसांना मिळताच तात्काळ पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार व पोलीस अमंलदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.घडलेला प्रकार हा अत्यंत गंभीर व संवेदनशील होता. गुन्ह्यातील फिर्यादी व साक्षीदार यांचेकडून गुन्ह्याबाबत फक्त एवढीच माहिती मिळालेली होती की, गुन्ह्यातील आरोपीतांकडे अंधारात अर्धवट नंबर प्लेट दिसली. एम.एच-04 क्रमांकाची एक पांढर्या रंगाची ती स्वीफ्ट डिझायर गाडी होती अशी त्रोटक माहिती मिळाली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व ठिकाणी तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील तसेच धुळे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना देखील नाकाबंदी लावण्यात आली, परंतु रात्रीचा वेळ असल्याने अंधाराचा फायदा घेवून आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले होते.पोलीस अधीक्षक यांनी गुन्ह्याचे तपासकामी स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे 6 वेगवेगळे पथके तयार करुन गुजरात, मध्य प्रदेश राज्यात रवाना करुन दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीताचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकांनी घटनास्थळाच्या परिसरातील अनेक सी. सी. टी. व्ही. तपासून अज्ञात आरोपीतांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला, घटना ही निर्जन स्थळी व अंधारात झालेली असल्यामुळे सी.सी.टी.व्ही. देखील जवळपास मिळणे शक्य होत नव्हते. त्यामुळे आरोपीतांची किंवा वाहनांची निश्चित माहिती मिळून येत नव्हती.दि. 11 मार्च 2023 रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, भालेर रस्त्यावर शेतकर्यांना लुटणार्या संशयीत आरोपीतांचे फिर्यादी सोबत गुजरात राज्यात कापुस विक्रीसाठी गेलेल्या व्यापार्याचे संबंध असण्याची शक्यता आहे. तरी त्यास ताब्यात घेवून सखोल विचारपूस करा असे सांगून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना तपासाबाबत सविस्तर सुचना दिल्याने श्री. खेडकर यांनी शेतकरी माल घेवून गेलेल्या गाडीचा चालक व सोबत असलेल्या कापुस व्यापार्याला 11 मार्च 2023 रोजी विचारपूस केली असता कापुस व्यापारी उमेश पाटील हा विचारपूस करणार्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे लक्षात आले, परंतु स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदारांनी गुन्हा घडल्यापासून तपासलेले सी.सी.टी.व्ही. फुटेज व संशयीत उमेश पाटील हा सांगत असलेली हकिकत यात तफावत आढळून आली.
यावरून विचारपूस करणार्या अधिकारी व अंमलदार यांना उमेश पाटील बाबत अधिक संशय आला. त्याची पोलीस अधीक्षक यांनी तो देत असलेल्या माहितीतील विसंगती त्याच्या लक्षात आणून देवून त्यास बोलते केले. त्यावेळी संशयीत उमेश पाटील याने सदरचा गुन्हा त्याचा धामणगांव जि. धुळे येथील नातेवाईक चैत्राम पाटील व त्याच्या इतर तीन साथीदारांच्या मदतीने केला असल्याची सविस्तर माहिती दिली.याबाबत सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली 3 पथके तयार करुन पथकाने तात्काळ धुळे जिल्ह्यातील धामणगांव गाठून सर्व संशयीत आरोपीतांना एकाच वेळी सापळा रचून ताब्यात घेण्याचे नियोजन केले.
त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या तिन्ही पथकांनी संशयीत आरोपीतांच्या घराबाहेर सापळा रचून एकाच वेळी चैत्राम ऊर्फ झेंडु राजधर पाटील, सागर ऊर्फ बंटी सुभाष पाटील, दिपक ऊर्फ बबलू सुभाष पाटील तिन्ही रा. धामणगांव ता.जि. धुळे यांना ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्यांनी गुन्ह्यातील बंदुकीचा धाक दाखवून जबरीने हिसकावलेले पैसे, बंदुक दिपक ऊर्फ बबलु यांचे शेतातील झोपडीमध्ये लपवून ठेवले असल्याबाबत सांगितले. तसेच गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन हे चौथा साथीदार धुळे जिल्ह्यातील शिरुड गावातील राहुल भोई नावाच्या तरुणाचे असल्याचे सांगितले.त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिपक ऊर्फ बबलू याचे शेतातील झोपडीमधून वापरत्या दुधाच्या गुलाबी रंगाच्या कॅनमधून 13 लाख 26 हजार 540 रुपये रोख व 25 हजार रुपये किमतीचे एक लोखंडी बनावटीचे पिस्तुल, 1200 रुपये किमतीचे चार जिवंत काडतूस कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत केले. तसेच एका पथक मिळालेल्या माहितीवरून धुळे जिल्ह्यातील शिरुड गावात गेले. गावात राहुल भोई नावाच्या तरुणाची माहिती घेत असता गावातील इसमाने एका ओट्यावर बिनधास्तपणे बसलेल्या होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुल बळीराम भोई रा. शिरुड ता. जि. धुळे यास ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशात 200 रुपये किमतीचा एक लोखंडी धारदार चाकू मिळून आला. त्यास गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी वाहनाबाबत विचारपूस केली असता घराच्या बाजूला झाकुन ठेवलेल्या स्वीफ्ट डिझायर गाडीकडे बोट दाखवून हीच गाडी गुन्हा करतेवेळी वापरली असल्याचे सांगितले. म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ते वाहन कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त केले. सदर गाडीच्या नोंदणी क्रमांकाबाबत माहिती घेण्यात येत आहे.
ताब्यात घेण्यात आलेले उमेश आत्माराम पाटील , चैत्राम ऊर्फ झेंडु राजधर पाटील, सागर ऊर्फ बंटी सुभाष पाटील , दिपक ऊर्फ बबलू सुभाष पाटील, राहुल बळीराम भोई रा. शिरुड ता. जि. धुळे व त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले 13 लाख 26 हजार 540 रुपये रोख, 25 हजार रुपये किमतीचे एक लोखंडी बनावटीचे पिस्तुल, 1200 रुपये किमतीचे चार जिवंत काडतूस, 200 रुपये किमतीचा एक लोखंडी धारदार चाकू, 50 हजार रुपये किमतीचे 5 विविध कंपनीचे मोबाईल व गुन्हा करतेवेळी वापरलेले 7 लाख रुपये किमतीचे वाहन, असा एकुण 21 लाख 2 हजार 940 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी व मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. अशा रितीने नंदुरबार पोलीसांनी अवघ्या 30 तासात गंभीर गुन्हा उघडकीस आणून मोलाची कामगिरी केली.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील व संपुर्ण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.