अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या घरफोडी व दरोड्याच्या प्रकरणांत पसार असलेल्या दोन संशयित आरोपींस स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याच्याकडून एक लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या तपासातून पाच घरफोडी गुन्ह्यांचा छडा लागलेला असून, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर दोन संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.
18 मे रोजी किरण विश्वनाथ खैरे (रा. भोरवाडी, ता. अहिल्यानगर) यांच्या घरात रात्री झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांचा तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिल्यानंतर, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पथकात अंमलदार दत्तात्रय हिंगडे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, मनोज लातुरकर, प्रशांत राठोड व मेघराज कोल्हे यांचा समावेश होता.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे 26 मे रोजी रांजणगाव मशीद येथून राजेश अशोक काळे (वय 24) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने भोरवाडी येथील चोरीसह आणखी चार गुन्ह्यांची कबुली दिली. त्याचे साथीदार राहुल चंदर भोसले, रा. खरातवाडी पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा (पसार) व प्रदीप उर्फ खुटल्या आरकास काळे, रा. रांजणगाव मशीद (पसार) यांचाही समावेश असल्याचे सांगितले. राजेशने पारनेर तालुक्यातील निघोज, राळेगणसिध्दी, चिंचोली, वाडेगव्हाण व शिर्डी येथील घरफोड्यांची कबुली दिली आहे. यानुसार पारनेर पोलीस ठाण्यातील तीन, सुपा व शिर्डी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हे उघडकीस आले आहेत.
तपासादरम्यान संशयित आरोपीने चोरीस गेलेले सोन्याचे दागिने बाबा किसन शेंडगे (रा. खरातवाडी) यास विक्रीस दिल्याचे उघड झाले. पथकाने त्यास ताब्यात घेत 14 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. उर्वरित दागिने बेलवंडी (ता. श्रीगोंदा) येथील एका सोनारास विकल्याचे संशयित आरोपीने सांगितले आहे. राजेश अशोक काळे याच्यावर पूर्वीचे दरोडा व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.