अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
रिल्स बनविण्याच्या बहाण्याने मित्राकडून 31 लाख 60 हजाराची रोकड व लॅपटॉप लुटणार्याच्या भावाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय ऊर्फ सागर राजेंद्र चौधर (वय 24 रा. निपाणी जळगाव, ता. पाथर्डी) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून 16 लाख 50 हजारांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
25 एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात श्रेयश पांडुरंग लटपटे (वय 23, रा. भायगाव, ता. शेवगाव) यांनी फिर्याद दिली की, त्यांचा मित्र सुजित राजेंद्र चौधर (रा. निपाणी जळगाव) याने त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना रिल्स बनविण्याचा बहाणा करून त्यांच्या कारमध्ये ठेवलेली 31 लाख 60 हजारांची रोकड व 10 हजार रुपयांचा लॅपटॉप चोरून पसार झाला आहे. यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाच्या दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाली की, सुजित चौधर याचा भाऊ अक्षय राजेंद्र चौधर याचा गुन्ह्यात सहभाग असल्याची शक्यता आहे.
पोलिसांनी अक्षय उर्फ सागर चौधर यास शिताफीने पकडले. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरलेल्या रकमेपैकी 16 लाख 50 हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. सुजित चौधर पसार असून, त्याचा शोध सुरू आहे. सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास जाधव, अंमलदार किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, अक्षय रोहोकले, राजेश राठोड, भगवान वंजारी, राहुल गुंड्डू यांच्या पथकाने ही कारवाई केली.