अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बारदरी (ता. अहिल्यानगर) रस्त्यावरील गर्भगिरी फाट्याजवळ मध्यरात्री थरारक दरोड्याची घटना घडली आहे. लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला वाहन थांबविलेल्या तरूणाच्या गळ्याला कोयता लावून तीन अनोळखी इसमांनी त्याच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख 82 हजार रूपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून नेला.
याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुलभ अंबादास नरसाळे (वय 29, रा. नालेगाव, कल्याण रस्ता, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी (24 जानेवारी) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते आपल्या वाहनातून जात असताना गर्भगिरी फाट्याजवळ लघुशंकेसाठी वाहन थांबवले होती. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला.
एका इसमाने फिर्यादीच्या गळ्याला लोखंडी कोयता लावून धमकावत त्यांच्या गळ्यातील अंदाजे 20 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, 15 ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या तसेच 12 हजार रूपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यानंतर तिन्ही इसम घटनास्थळावरून पसार झाले. घटनेनंतर फिर्यादी यांनी रविवारी (25 जानेवारी) सायंकाळी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आला. पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे अधिक तपास करीत आहेत.




