उंबरे । वार्ताहर
चारचाकी वाहनातून सुमारे 17 लाख रुपयांची रोकड घेऊन जात असताना पाठीमागून चारचाकी वाहनातून आलेल्या चार भामट्यांनी वाहनाच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. त्यानंतर रोकड असलेली बॅग घेऊन भामटे पसार झाले. ही घटना काल राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी परिसरात घडली.
तालुक्यातील ब्राम्हणी परीसरात असलेल्या माऊली दूध येथील कर्मचारी अनिल बनसोडे व चालक असे दोघेजण काल सकाळी 11 वाजे दरम्यान सुमारे 17 लाख रुपयांची रोकड घेऊन त्यांच्याकडील चारचाकी वाहन (क्र. एमएच 17 एजे 9004) यातून ब्राम्हणी येथील एका बँकेत भरणा करण्यासाठी जात होते. ते ब्राम्हणी शिवारातील तांबे वस्तीजवळ असताना एका काळ्या रंगाच्या विना नंबरच्या चारचाकी वाहनातून आलेल्या चार भामट्यांनी बनसोडे यांची गाडी रस्त्यावर अडवली आणि रोकड असलेल्या वाहनाच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. तसेच बनसोडे व चालकाला धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड असलेली बॅग हिसकावून सोनईच्या दिशेने पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपाधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, हवालदार रोहिदास नवगिरे, वाल्मिक पारधी, नदिम शेख, प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे, सतीश कुर्हाडे, अंकुश भोसले, लक्ष्मण खेडकर यांच्यासह अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आणि आरोपींचा शोध सुरु केला. तसेच अहिल्यानगर येथील ठसे तज्ञ पथकाने घटनास्थळी धाव घेऊन ओरोपींचे ठसे मिळविण्याचा प्रयत्न केला. सदर भामटे ज्या वाहनातून आले होते, ते वाहन माऊली दुध उद्योग परिसरात सुमारे अर्धा तास थांबले होते. त्यांनी पाळद ठेवून सदर रोख रक्कम लुटून नेल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. भर दिवसा झालेल्या या रस्तालूटीने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाली आहेत. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात रस्तालुटीचा गन्हा दाखल करण्यात आला आहे.