Sunday, October 6, 2024
Homeक्राईमश्रीगोंदा तालुक्यात दरोड्याचे सत्र, पोलिसांबाबत प्रश्नचिन्ह

श्रीगोंदा तालुक्यात दरोड्याचे सत्र, पोलिसांबाबत प्रश्नचिन्ह

एकाच घरावर महिनाभरात दुसर्‍यांदा दरोडा टाकण्याचा प्रयत्न || दरोडेखोरांच्या दिशेने गोळीबार;

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यात सध्या विविध गावांत दरोड्याची मालिका जोरात आहे. रात्रीच्यावेळी ड्रोनच्या मदतीने लक्ष ठेवून दरोड्याचे प्रकार सुरू असल्याची अफवा असताना एकाच व्यक्तीच्या घरावर एक महिनाभराच्या आतच दुसर्‍यांदा दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यावेळी संबंधित व्यक्तीने दरोडेखारांच्या दिशेने हवेत गोळीबार केल्याने दरोडेखोर पसार झाले आहेत. मात्र, दरोड्याच्या घटना घडू नयेत, यासाठी पोलिसांनी काय उपाययोजना केल्या याचा तपशील मिळाला नाही.

- Advertisement -

सुभाष मारूती भोस हे भावडी गावातील रहिवासी कुटुंबासमवेत भावडीच्या भोसले मळा भागात राहतात. भोस यांच्याकडे सुरक्षेसाठी सरकार मान्य बंदूक आहे. दरम्यान, 15 जूनला भोस यांनी श्रीगोंदा तालुका पोलिसांकडे दरोड्याचा प्रयत्न झाल्याची फिर्याद दाखल केलेली आहे. त्या फिर्यादीनुसार तपास पूर्ण झाला नसताना अथवा पोलीस तपासाची दिशा निश्चित करण्यापूर्वीच भोस यांच्या घरावर दुसर्‍यांदा दरोड्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. 18 जुलै रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास भोस यांच्या घराच्या संरक्षक भिंतीवरील तारांचे कुंपण तोडून दरोडेखोरांनी घराच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न केला.

यावेळी भोस यांच्या श्वानामुळे भोस कुटुंबीय जागे झाले. यावेळी सुभाष भोस यांनी त्यांच्या परवानाधारक बंदुकीमधून स्व संरक्षणासाठी हल्लेखोरांच्या दिशेने हवेत गोळीबार केला. यामुळे दरोडेखोर पसार झाले. दरम्यान, भोस यांच्या घरावर दरोड्याचा पहिला प्रयत्न झाल्यानंतर दाखल तक्रारीला एक महिना होण्याच्या आधी दुसर्‍यांदा घरावर दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे भोस कुटुंबियांच्या जीवीताला धोका असण्याची शक्यता आहे. संभाव्य धोका ओळखून पोलीस यंत्रणेने याप्रकरणाची सखोल चौकशी करून तपास करावा. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तालुक्यातील सुरू असलेल्या दरोड्याच्या मालिका थांबायचे नाव घेत नाहीत. आता तक्रार दाखल करूनही पुन्हा-पुन्हा दरोड्याचे प्रयत्न होत आहेत.त्यामुळे श्रीगोंदा तालुका पोलीस यंत्रणेच्या कारभारावर टीका होत असून जिल्हा पोलीस अधीक्षक तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेसोबत वाढत्या चोर्‍या, दरोडे रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या