बिहार | Bihar
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने तब्बल २०२ जागा जिंकत मोठ्या प्रमाणात बहुमत मिळवलं, तर या निवडणुकीत विरोधकांचा दारूण पराभव झाला. त्यामुळे महाआघाडीला मोठा धक्का बसला. मात्र, बिहार निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाला आलेल्या अपयशानंतर लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे.
बिहार निवडणूक निकालानंतर लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा केला आहे. सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर करत संजय यादव आणि रमीज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत “मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मला मारण्यासाठी चप्पल उचलली. मी ढसाढसा रडत आई-वडिलांचं घर सोडले” असा आरोप रोहिणी आचार्य यांनी केला आहे.
रोहिणी आचार्य यांनी पोस्टमध्ये काय म्हंटले आहे?
“काल एका मुलीला, एका बहिणीला, एका विवाहित महिलेला, एका आईला अपमानित करण्यात आलं, घाणेरड्या शिव्या देण्यात आल्या. मला मारण्यासाठी चप्पल उगारण्यात आली. पण मी माझ्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही, सत्याचा त्याग केला नाही. फक्त आणि फक्त यामुळे मला अपमान सहन करावा लागला. काल एका मुलीने तिच्या आईवडिलांना आणि बहिणींना असहाय्यतेनं सोडलं, मला माझं माहेरचं घर सोडावं लागलं, मला अनाथ बनवण्यात आलं. तुम्ही सर्वांनी कधीही माझ्या मार्गावर जाऊ नका. रोहिणीसारखी मुलगी किंवा बहीण कोणत्याही घरात जन्माला येऊ नये”, असे रोहिणी आचार्य यांनी म्हटले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर रोहिणी आचार्य यांनी ही पोस्ट केली आहे. कालच त्यांनी राजकारण सोडण्याचा आणि कुटुंबापासून वेगळे होण्याचा मोठा निर्णय जाहीर केला, ज्यामुळे विविध चर्चा जोरदार रंगल्या आहेत. दरम्यान, या संपूर्ण वादावर लालू प्रसाद यादव किंवा तेजस्वी यादव यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




