कर्जत |प्रतिनिधी| Karjat
येथील नगरपंचायतच्या नगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले यांनी बुधवारी (दि.30) उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकार्यांकडे दिला. यावेळी गटनेते संतोष मेहत्रे, नगरसेवक भास्कर भैलुमे, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल उपस्थित होते. रोहिणी घुले यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे आता या रिक्त झालेल्या पदावर ठरल्याप्रमाणे कर्जत नगरपंचायतचे गटनेते संतोष मेहत्रे यांची वर्णी लागणार आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी स्वतः याबाबत घोषणा केली आहे.
2 मे ला नगराध्यक्षपदी रोहिणी सचिन घुले यांच्या निवडीची अधिकृत घोषणा होणार आहे. यानंतर या रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल. त्यामध्ये विद्यमान गटनेते श्री.मेहेत्रे यांची निवड निश्चित आहे.
दरम्यान कर्जत नगरपंचायतच्या गटनेतेपदाच्या नोंदणीसाठी अमृत काळदाते यांनी जिल्हाधिकार्यांकडे अर्ज केला होता. हा अर्ज जिल्हाधिकार्यांनी फेटाळला. त्यानंतर अमृत काळदाते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली. याचिकेवर बुधवारी सुनवाणी होऊन न्यायालयाने जिल्हाधिकार्यांंचा आदेश रद्द केला आहे. पुढील तीन आठवड्यामध्ये अमृत काळदाते यांच्या अर्जावर निर्णय घ्यावा, असे आदेश दिले आहेत, अशी माहिती अमृत काळदाते यांचे वकील महेश देशमुख यांनी दिली.
दरम्यान, कर्जत नगरपंचायत चे रिक्त झालेले उपनगराध्यक्षपद हे एक महिन्याच्या आत भरावे लागणार आहे. तर गटनेते पदाबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी यांना तीन आठवडे पूर्ण होण्यापूर्वी घ्यावा लागणार आहे. यामुळे जिल्हाधिकारी आता कोणता निर्णय अगोदर घेणार हे पाहणे मोठे रंजक ठरणार आहे. अपेक्षेप्रमाणे उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकार्यांनी तात्काळ जाहीर केल्यास उपनगराध्यक्ष पद निवडीसाठी गटनेते संतोष मेहत्रे यांचाच व्हीप सर्व 15 नगरसेवकांना बंधनकारक असणार आहे.