Saturday, May 24, 2025
Homeब्रेकिंग न्यूजRohini Khadse: "राज्याला पार्ट टाईम नव्हे तर फुलटाईम"....; रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र...

Rohini Khadse: “राज्याला पार्ट टाईम नव्हे तर फुलटाईम”….; रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहीत केली मागणी, काय आहे कारण

पुणे | Pune
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची सध्या राज्यात जोरदार चर्चा आहे. सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा, सासरा राजेंद्र हगवणे यांना अटक केली आहे.

- Advertisement -

हगवणे कुटुंबियांकडून त्यांची मोठी सून मयुरी जगताप हिला देखील मारहाण करण्यात येत होती. मयुरी जगताप हिच्या आई आणि भावाने राज्य महिला आयोगाला लिहिलेले सहा महिन्यापूर्वीच पत्र समोर आले. मात्र, महिला आयोगाकडून या पत्राची दखल घेण्यात आली नाही. यावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर राजकीय वर्तुळात टीकेची झोड उठत आहे. हगवणे कुटुंबाबाबत आलेल्या तक्रारीवर महिला आयोगाने कारवाई केली असती तर आज वैष्णवी जिवंत असती. त्यामुळे वैष्णवीच्या मृत्यूला महिला आयोग जबाबदार आहे अस म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

रोहिणी खडसे सातत्याने चाकणकर यांच्यावर टीका करत आहेत. आताही राज्याला पार्ट टाईम नव्हे तर फुलटाईम महिला आयोग अध्यक्षा हव्या असल्याचे सांगत खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे.

रोहिणी खडसे यांनी पत्रात काय म्हंटले आहे?
सध्याच्या महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्या त्यांच्या पक्षात एका प्रमुख पदावरही आहेत. त्यामुळे ही दुहेरी भूमिका बजावत असताना त्यांना महिला अत्याचारांच्या प्रकरणात वेळ मिळत नसावा, असे रोहिणी खडसे यांचे म्हणणे आहे. पण पक्षाच्या कामामुळे महिला आयोगाच्या पदावर अन्याय होता कामा नये. कारण त्याचा फरक थेट महिलांवरील प्रश्नांवर पडेल. त्यामुळे आता राज्याला पार्ट टाईम नव्हे तर फुलटाईम महिला आयोग अध्यक्षा हव्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांची मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

रोहिणी खडसे पत्रात पुढे म्हणतात, सध्या राज्यात पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण केंद्र स्थानी आहे. हे प्रकरण हुंडाबळीचे आहे असे स्पष्ट दिसत आहे. आत्महत्या करण्याआधी सासरच्या मंडळींनी वैष्णवी यांचा प्रचंड छळ केल्याच्या गोष्टी समोर येत आहेत. हगवणे कुटुंबात फक्त वैष्णवी यांचाच छळ झाला नाही तर त्यांची मोठी सून मयुरी हगवणे यांचा देखील अशाच प्रकारे छळ करण्यात आला होता. मयुरी यांनी त्यावेळी महिला आयोगात धाव घेतली, मात्र त्याबाबत काही ठोस पाऊले उचलली नाहीत. आरोपी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पदाधिकारी होता म्हणून त्याला वाचवण्यात आले का, असा आमचा प्रश्न असल्याचेही खडसे यांनी म्हटले आहे. जर महिला आयोगाने मयुरी यांच्याच प्रकरणात कठोर पावले उचलली असती तर कदाचित आज वैष्णवी जिवंत असती अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

आपल्या राज्यात येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अन्यायकारक वागणूक वाढत आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असताना हुंड्यापायी होणाऱ्या त्रासाला कंटाळून हडपसरमध्येही एका महिलेने आत्महत्या केली आहे. दीपा प्रसाद पुजारी असे त्या महिलेचे नाव आहे. मध्यंतरी पुण्यात एका परदेशी महिलेवरती लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शंतनू कुकडे याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणातही सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्याचे नाव आले होते. हे प्रकरण ही प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते. त्या विदेशी महिलेला न्याय मिळाला की नाही याबाबत काहीच थांगपत्ता नाही. सांगण्याचे तात्पर्य इतकेच की राज्यात विविध ठिकाणी असे प्रकार घडत आहे पण महिला आयोग महिलांना न्याय देण्यात असमर्थ ठरत आहे असा थेट आरोप त्यांनी केला.

हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी जगताप हिनेसुद्धा माहिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीमध्ये सासऱ्याने मारहाण केल्याचा उल्लेख होता. त्यानंतरसुद्धा आयोगाने कारवाई केली नाही. उलट महिला आयोगाने ही घटना समोपचाराने मिटवली. या प्रकरणात आयोगाने हगवणे कुटुंबाला पाठिशी घातले. कारण ते राजकीय पक्षाचे पदाधिकारी होते, असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे.

रोहिणी खडसे यांनी पुढे म्हटले की, मी वैष्णवीच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचा आक्रोश पाहिला. या घटनेमध्ये काय, काय झाले असेल याचा अंदाज लावण्यात आला. वैष्णवीच्या अंगावरती १९ ठिकाणी जखमा झाल्या होत्या. त्याचे फोटो पाहून मारहाणीची अत्यंत क्रूरता पाहायला मिळाली. आम्ही कस्पटे कुटुंबियांना न्याय मिळवू देण्यासाठी त्यांच्या पाठीशी आहोत.

वैष्णवीच्या प्रकरणात दाखल गुन्ह्यात एफआयआरमध्ये सौम्य कलमे लावण्यात आलेले आहेत. ती कलमे कठोर करुन हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे. ज्यामुळे वैष्णवीला आणि तिच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळेल, अशी मागणी देखील रोहिणी खडसे यांनी केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Vaishnavi Hagawane Death : दिराने बैलासमोर ठेवला गौतमी पाटीलचा कार्यक्रम; Video...

0
पुणे | Pune  पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून (दि.१६ मे) रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी पती शशांक, नणंद...