Tuesday, January 6, 2026
HomeनगरRohit Pawar : "थोरात साहेबांविषयी तक्रार नाही पण…"; रोहित पवार नेमकं काय...

Rohit Pawar : “थोरात साहेबांविषयी तक्रार नाही पण…”; रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

अहिल्यानगर । Ahilyanagar

जामखेड नगरपालिका निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये पुन्हा एकदा तणाव उफाळून आला आहे. या निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे प्रचंड संतप्त झाले होते. त्यांनी थेट महाविकास आघाडीतील भागीदार असलेल्या काँग्रेसवर गंभीर आरोप करत, काँग्रेस ही प्रत्यक्षात भाजपची “बी-टीम” असल्याचा दावा केला होता. या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

- Advertisement -

रोहित पवारांच्या या वक्तव्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता रोहित पवार यांनी आपली भूमिका काही अंशी स्पष्ट करत, थोरात साहेबांविषयी कोणतीही वैयक्तिक तक्रार नसल्याचे सांगितले आहे. मात्र, काँग्रेसच्या स्थानिक कार्यपद्धतीवर त्यांनी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

YouTube video player

थोरात यांच्या पलटवारानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल आपल्याला कायम आदरच आहे आणि त्यांच्याविषयी कोणतीही तक्रार नाही. मात्र, जामखेडमधील निवडणूक प्रक्रियेत जे घडले, त्याबाबत गंभीर आक्षेप असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हंटले आहे की, “थोरात साहेब आपला इंटरव्ह्यू बघितला.. आपल्याविषयी काहीही तक्रार नाही, कायमच आदरच आहे, पण ज्यांनी माझ्याविरोधात प्रा. राम शिंदे यांचा प्रचार केला त्यांनाच काँग्रेसने पदं दिली. त्यांचे हे फोटो आपण आवर्जून बघा.. यांचे आपल्यासोबत कमी पण भाजप नेत्यांसोबतच अधिक फोटो आहेत. शिवाय काँग्रेसने ज्याला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली तो आहे भाजप आमदाराचा कार्यकर्ता. ज्याने आष्टी विधानसभा निवडणुकीत आमच्या उमेदवाराविरोधात काम केलं.”

तसेच, “असं असेल तर हे लोक भाजपाची बी-टीम नाही का? आणि आपणच सांगा अशा घरभेद्या ‘बी-टीम’ सोबत मी चर्चा कशी करणार? आश्चर्य याचं वाटतं दिल्लीत मा. राहुल जी गांधी हे भाजपाविरोधात ताकदीने दोन हात करतात आणि इकडं गल्लीत मात्र काँग्रेसच भाजपाच्या हातात हात घालतोय.. हे कितपत योग्य आहे?” असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

बाळासाहेब थोरात यांनी म्हंटल होत की, कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीपासूनच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये रोहित पवारांविषयी नाराजी आहे. कारण रोहित पवार काँग्रेस कार्यकर्त्यांशी पुरेसा संवाद साधत नाहीत, त्यांना विश्वासात घेत नाहीत आणि अनेक निर्णय परस्पर घेतात. याबाबत रोहित पवारांना आधीच सूचना देण्यात आल्या होत्या. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करा, संवाद ठेवा, असे सांगूनही त्यांनी तसे न केल्यामुळे, जामखेड नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतंत्र भूमिका घेतल्याचे थोरात यांनी सांगितले. याच भूमिकेचे समर्थन करत त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची बाजू मांडली आहे.

या वादामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून, आगामी काळात या तणावाचा स्थानिक तसेच राज्यस्तरीय राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

0
सटाणा | प्रतिनिधी Satana साक्री-शिर्डी रस्त्यावर ढोलबारे गावाजवळ मोटरसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले. संदीप गावित(३५) व आशाबाई संदीप गावित(३२) रा. अमली...