Saturday, July 27, 2024
Homeराजकीयमहायुती लोकसभेच्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी थेट आकडाच सांगितला

महायुती लोकसभेच्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी थेट आकडाच सांगितला

नाशिक | Nashik

नुकतेच राज्यात पहिल्या चार टप्प्यातील मतदान (Voting) पार पडले असून पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभेचा (Nashik and Dindori Lok Sabha) समावेश असून आज या दोन्ही मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) सभा पार पडणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा होणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस नाशिकसाठी ब्लॉकबस्टर ठरणार आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे कालच महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांच्या प्रचारार्थ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच राज्यात महायुती लोकसभेच्या किती जागा जिंकणार? याबाबतही मोठे विधान केले आहे.

यावेळी बोलतांना रोहित पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर पैशाचे वाटप करण्यात आले आहे. पंरतु, महायुतीने कितीही सत्ता आणि पैशांचा दुरुपयोग केला तरी काहीही उपयोग होणार नाही. कारण राज्यात भाजपला (BJP) जास्तीत जास्त १६ ते १८ जागा मिळतील. तसेच शिंदेंच्या शिवसेनेला (Shivsena) १ ते ३ जागा मिळतील. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता यावर महायुतीच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

तसेच डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांच्यावर टीका करतांना पवार म्हणाले की, केंद्रात राज्य आरोग्यमंत्री असतांनाही मतदारसंघातील गरोदर मातांना आरोग्य सोयी सुविधा न मिळाल्याने जीव गमवावा लागतो. सर्वाधिक माता बाल दगावण्याच्या घटना नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने या आदिवासी भागात झालेल्या आहेत. या भागात नव्याने दवाखाने मंजूर नाही. त्यामुळे आदिवासींच्या आरोग्याशी खेळणार्‍या आरोग्यमंत्र्यांना त्यांची जागा दाखवावी, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या