मुंबई | Mumbai
एकापाठोपाठ एक वादग्रस्त करणारे मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे हे कायम विरोधी पक्षाच्या रडारवर असतात. संभाजी भिडे यांनी सातत्याने केलेल्या वादग्रस्त विधानांबाबत आक्रमक होत विरोधकांनी सरकारकडे कारवाईची मागणी केली.
अलीकडेच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यांच्याबाबत निवेदन सादर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांचा ‘भिडे गुरुजी’ असा उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिर्डीतील साईबाबा मंदिरातील फोटो ट्विट करत संभाजी भिडेंवर निशाणा साधला आहे.
दरम्यान काल, गुरुवारी शिर्डीमध्ये शासन आपल्या गावी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीतील साईबाबांच्या मंदिराला भेट दिली. त्याबद्दल त्यांनी ट्वीट ही केले होते. मला श्री साईबाबांची पूजा करण्याचे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. यावेळी मंदिराच्या विश्वस्तांनी सर्वांचे स्वागत केले, असे त्यांनी म्हटले होते. हाच धागा पकडत रोहित पवार यांनी फडणवीसांचा साईबाबा मंदिरातील फोटो ट्विट करत भिडे गुरुजींवर निशाणा साधला आहे.
‘श्री साईबाबा हे आमचे श्रद्धास्थान आहे, हे त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्ही आपल्याच कथित ‘गुरुजीं’ना ज्ञानामृत पाजले, हे बरे झाले. याबद्दल आपले खरंच आभार, असा टोला त्यांनी ट्विटरवरून लगावला आहे. आता इतर थोर व्यक्ती आणि संतांविषयी चुकीची वक्तव्य करणाऱ्यांविरोधातही कारवाई करून आपले गृहमंत्र्यांचे मनगट आहे, हेही दाखवून द्यावे, असे आवाहनही रोहित पवार यांनी केले आहे.