मुंबई । Mumbai
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नावर भाष्य करत तो सोडवण्यासाठी आपण मध्यस्थी करू शकतो, असेही विधान केले होते.
मात्र या हस्तक्षेपावर देशांतर्गत राजकारणात संतापाची लाट उसळली असून, विरोधकांनी ट्रम्प यांच्या पुढाकारावर तीव्र आक्षेप घेतले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी एक ट्वीट शेअर करून १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाची आठवण करून दिली आहे.
रोहित पवारांची पोस्ट काय?
१९७१ च्या युद्धात तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि जगाच्या नकाशावर बांगलादेश नावाच्या नवीन देशाला जन्म दिला, तेंव्हाची ही घटना आहे.
1971 मध्ये पूर्व पाकिस्तानमध्ये (आताचे बांगलादेश) स्वातंत्र्याची चळवळ जोरात होती. शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीगने पाकिस्तानच्या निवडणुकीत बहुमत मिळवले, परंतु पश्चिम पाकिस्तानच्या सत्ताधारी वर्गाने सत्ता सोपवण्यास नकार दिला. यामुळे पूर्व पाकिस्तानात हिंसाचार आणि अत्याचार वाढले आणि सुमारे 1 कोटी निर्वासित भारतात आले. पाकिस्तानला पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी आपले सातवे आरमार बंगालच्या उपसागरात पाठवले. हा एक प्रकारे भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होता, जेणेकरून भारताने युद्धात हस्तक्षेप करू नये. पण तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी या दबावाला भीक न घालता कणखर भूमिका घेतली आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर यांना स्पष्टपणे सांगितले की, अमेरिकेने पाकिस्तानला आवरले नाही तर भारताला कारवाई करावी लागेल. त्यांनी लष्करप्रमुख सॅम मानेकशॉ यांना पूर्ण स्वातंत्र्य देत युद्धाची तयारी केली. ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ले केले आणि भारताने प्रत्युत्तरात युद्ध पुकारले. अवघ्या १३ दिवसांत भारतीय सैन्याने पूर्व पाकिस्तानात निर्णायक विजय मिळवला आणि १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांनी शरणांगती पत्करली.
पाकिस्ताने दोन तुकडे होऊन बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतरच इंदिरा गांधी यांनी युद्धविराम घोषित केला. कारण त्या इंदिरा गांधी होत्या…
आर्यन लेडी..!
त्यावेळी विरोधी पक्षात असलेले नेते अटलबिहारी वाजपेयी साहेबांनीही आदराने ‘दुर्गा’ या शब्दांत त्यांचा उल्लेख केला होता. म्हणूनच इंदिरा गांधी या कणखर नेत्याच्या साहस, स्वाभिमान, देशप्रेम आणि नेतृत्वगुणाची आजही उजळणी होते.
एकमेकांचा सन्मान राखणारे, मोठेपण मान्य करणारे आणि अंगी दिलदारपणा, देशप्रेम असणारे, कोणत्याही महासत्तेपुढे न झुकणारे थोर ते तत्कालीन सत्ताधारी आणि थोर ते तत्कालीन विरोधी पक्षाचे नेते!
https://x.com/RRPSpeaks/status/1921786926383644912