Tuesday, January 6, 2026
HomeनगरRohit Pawar : काँग्रेसच भाजपची बी-टीम; रोहित पवारांनी फोडलं पराभवाचं खापर काँग्रेसच्या...

Rohit Pawar : काँग्रेसच भाजपची बी-टीम; रोहित पवारांनी फोडलं पराभवाचं खापर काँग्रेसच्या नेत्यांवर

मुंबई । Mumbai

राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, भारतीय जनता पक्षाने (भाजप) या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व राखले आहे. संपूर्ण राज्यात भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. मात्र, या सर्व निकालांमध्ये जामखेड नगरपरिषदेच्या निकालाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत भाजपच्या विजयाने पवारांना मोठा धक्का दिला आहे.

- Advertisement -

जामखेडमधील पराभवानंतर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपली नाराजी व्यक्त करतानाच, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या पराभवामुळे स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

YouTube video player

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम आणि उमेदवारांनी दिलेली झुंज पाहता, आजचा निकाल अत्यंत निराशाजनक आणि काम करणाऱ्याला नाऊमेद करणारा आहे. जनतेने यापूर्वी दोनदा मला भरभरून प्रेम दिले, त्याबद्दल मी ऋणी आहे. मात्र, सध्या तत्त्व आणि विकासाचे राजकारण कमी होऊन पैशांनी गढूळ झालेले राजकारण अधिक दिसत आहे.” त्यांनी पुढे नमूद केले की, सामान्य कुटुंबातील उमेदवार, शेतकरी आणि बचत गटातील महिलांना सत्तेच्या प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न होता. पण जर सर्वत्र केवळ पैसाच चालणार असेल, तर अशा सामान्य उमेदवारांना न्याय कधी मिळणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या पोस्टमधील सर्वात खळबळजनक मुद्दा म्हणजे काँग्रेस नेत्यांवरील टीका. रोहित पवार यांनी थेट नाव न घेता जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “धर्मनिरपेक्षतेचा जप करणाऱ्या काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभे करून भाजपची ‘बी-टीम’ म्हणून काम केले. यामुळे जातीयवादी शक्तींच्या विजयाला हातभार लागला आणि जनताही या तिरक्या चालीला बळी पडली.” या प्रसंगानंतर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांवर भविष्यात कसा विश्वास ठेवायचा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

निवडून आलेल्या काही विरोधी उमेदवारांच्या पार्श्वभूमीवरही रोहित पवारांनी कडक शब्दांत टीका केली आहे. “आमच्या विरोधात निवडून आलेल्या काही लोकांचे कारनामे आणि धंदे बघितले तर चारचौघात त्यांचे नाव घेण्याचीही लाज वाटते,” असे म्हणत त्यांनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. जामखेडमधील या निकालाने आणि रोहित पवारांच्या आरोपांमुळे आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेली ही दरी आगामी विधानसभा निवडणुकीत काय वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

0
सटाणा | प्रतिनिधी Satana साक्री-शिर्डी रस्त्यावर ढोलबारे गावाजवळ मोटरसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले. संदीप गावित(३५) व आशाबाई संदीप गावित(३२) रा. अमली...