मुंबई । Mumbai
आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता राज्यात लागू झाली असतानाच पुण्याजवळील खेडशिवापूर टोल नाका येथील निवडणूक आयोगाच्या चेक पोस्टच्या तपासणीत एका गाडीतून पाच कोटी रुपये मिळाल्याचं समोर आल आहे. रात्री घडलेल्या या घडामोडींमुळे एकच खळबळ उडाली आहे.
विरोधकांनी याप्रकरणी महायुतीवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी शहाजी बापू यांना चिमटा काढल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा त्यांच्या नावाची री ओढली. पैशांच्या थप्पीचा व्हिडिओ शेअर करत, “एक गाडी सापडली, चार गाड्या कुठे आहेत?”, असा खोचक सवाल त्यांनी केला.
रोहित पवार ट्वीटरवर काय म्हणाले?
“सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून २५ -२५ कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूरच्या डोंगर झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत ?लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु,इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ओके करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे. कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं!”
दरम्यान, खेड शिवापुर येथे कारमध्ये सापडलेल्या पाच कोटी रक्कमेबाबत आमदार शहाजी बापू पाटील यांनी खुलासा केला आहे. ती गाडी माझी किंवा माझ्या कुटुंबातील नसून त्यात आमचा काहीही संबंध नाही, असं आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले, संजय राऊत यांना दिवसा रात्री आम्हीच दिसतोय. आम्ही बंड यशस्वी केला तेव्हापासून संजय राऊत हे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. गाडी ज्या व्यक्तीची आहे, तो अमोल नलावडे हा नक्की कोणत्या पक्षाचा आहे हे सांगू शकत नाही.