पुणे (प्रतिनिधी)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारावरून आणि परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली असून सरकारला थेट एक आठवड्याचा अल्टिमेटम दिला आहे.
केवळ विशेष तपास पथक किंवा कृतीगटाचे कागदी घोडे नाचवून वेळकाढूपणा करण्यापेक्षा एमपीएससीच्या भ्रष्ट अध्यक्षांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, ही या लढ्याची प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गणेश विसर्जनापर्यंत सरकारने यावर ठोस पावले न उचलल्यास पुण्यात पुन्हा एकदा भव्य आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सध्या राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून, या सण-उत्सवाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांची कोणतीही अडचण किंवा गैरसोय होऊ नये तसेच सुरक्षा यंत्रणांवर अतिरिक्त ताण पडू नये, या सामाजिक जाणिवेतून विद्यार्थी आणि आंदोलकांनी आपल्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. तथापि, हा केवळ तात्पुरता ब्रेक असून सरकारला आपल्या कारभारात आणि भूमिकेत सुधारणा करण्यासाठी मिळालेली ही एक आठवड्याची मुदत आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.
एमपीएससीच्या सध्याचे अध्यक्ष भीमनवार कार्यपद्धतीवर राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांचा प्रचंड रोष आहे. त्यामुळे कोणत्याही चौकशी समित्या किंवा कृतीगट स्थापन करून विषय लांबवत ठेवण्याऐवजी थेट अध्यक्षांचा राजीनामा घेणे किंवा त्यांची हकालपट्टी करणे हीच विद्यार्थ्यांची मूळ मागणी आहे. यासोबतच, सन २०२६ मध्ये राज्य शासनातील तब्बल ७० हजार पदांची ‘मेगाभरती’ करण्याबाबत सरकारने जो शब्द दिला होता, त्याची आठवण करून देत या आश्वासनाची त्वरित पूर्तता करून भरती प्रक्रिया सुरु करण्याची आग्रही मागणीही पवारांनी केली आहे.
येत्या आठवडाभरात म्हणजेच गणेश विसर्जनाच्या कालावधीपर्यंत सरकारने एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा आणि ७० हजार पदांच्या मेगाभरतीबाबत सकारात्मक व ठोस निर्णय न घेतल्यास, पुण्यात पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी पडणार आहे. या संभाव्य मोठ्या आंदोलनाची निश्चित वेळ, स्थळ आणि तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे सांगत रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.




